सायबर सुरक्षेसाठी "थिंक बिफोर क्लिक व्हेरिफाय ट्रस्ट"चा अवलंब करावा
सायबर सुरक्षेसाठी ‘थिंक बिफोर क्लिक, व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट’चा अवलंब करा...
खुलताबाद येथे लोकसंवाद अंतर्गत सायबर जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजनगर (औरंगाबाद), दि. 21(डि-24 न्यूज)- इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक, अॅप किंवा एपीके फाइल उघडण्यापूर्वी विचार करा, मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची पडताळणी करा आणि ऑनलाइन असताना सतर्क राहा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत श्री शेतकरी मराठा गणेश मंडळ, मोठी कुणबी आळी, खुलताबाद येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सतीश बडे बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक परसराम बारगळ यांच्यासह गणेश।मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी ‘Think Before Click, Verify Before Trust आणि Alert Online’ हे सायबर सुरक्षेचे तीन महत्त्वाचे नियम नागरिकांनी दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले.
अनोळखी लिंक व APK फाइलपासून सावधान...
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, APK फाइल, आकर्षक संदेश किंवा संशयास्पद ऑफरवर तात्काळ विश्वास ठेवू नये. वाहतूक दंड, वीज बिल, केवायसी अपडेट, बँक खाते बंद होणे अशा विविध कारणांचा वापर करून नागरिकांना फसविण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे कोणतीही फाइल किंवा लिंक उघडण्यापूर्वी ती अधिकृत स्रोताकडून आली आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.
पोलीस हवालदार गणेश घोरपडे यांनी नागरिकांना सोशल मीडिया, बनावट लिंक, संशयास्पद अॅप्स आणि फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. केवळ मोबाईल किंवा अँटीव्हायरसच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता स्वतःची जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
आकर्षक ऑफर आणि गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका...
ऑनलाइन गुंतवणुकीत मोठा परतावा, कमी किमतीत महाग वस्तू, घरबसल्या मोठी कमाई, पैसे दुप्पट करण्याचे आमिष किंवा अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या आकर्षक ऑफर याबाबत नागरिकांनी सावध राहावे. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी संबंधित कंपनी, संस्था किंवा व्यक्तीची अधिकृत माध्यमातून पडताळणी करावी. ‘आकर्षक दिसते म्हणून खरे असेलच असे नाही’, हा नियम ऑनलाइन व्यवहारात लक्षात ठेवावा.
पालकांनी मुलांच्या ऑनलाइन वापरावर लक्ष ठेवावे...
लहान मुले व तरुणांचा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता पालकांनी त्यांच्याशी नियमित संवाद साधावा. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क, संशयास्पद लिंक, गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता आणि वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके याबाबत मुलांना माहिती द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क
सायबर गुन्हा किंवा ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास लाज, भीती किंवा बदनामीच्या कारणामुळे घटना लपवून ठेवू नये. आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच संबंधित बँक व पोलिसांना माहिती द्यावी. वेळेत तक्रार केल्यास पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया लवकर सुरू करता येऊ शकते.
पोलीस विभागाचा सायबर जनजागृतीवर भर...
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या संकल्पनेतून नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सायबर पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने खुलताबाद येथे नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक नागरिकाने ‘Think Before Click, Verify Before Trust आणि Alert Online’ हे तीन नियम आपल्या दैनंदिन इंटरनेट वापराचा भाग बनवावेत आणि स्वतःसोबत कुटुंबीय व परिचितांनाही सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी केले.
What's Your Reaction?