फिट संभाजीनगर उपक्रमातून शहरातील क्रीडा कौशल्याला मिळणार व्यासपीठ
फिट संभाजीनगर’ उपक्रमातून शहरातील क्रीडा कौशल्याला मिळणार व्यासपीठ
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे, विविध क्रीडा प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि नागरिकांमध्ये आरोग्य व फिटनेसबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ‘फिट संभाजीनगर’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
‘फिट संभाजीनगर’ उपक्रमाचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज एका बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या उपक्रमात शहरातील विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षक (कोच) तसेच क्रीडा संघटनांनी सहभागी व्हावे. शहरातील स्थानिक व पारंपरिक क्रीडा प्रकारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे. यामध्ये कबड्डी, कुस्ती यांसह विविध पारंपरिक खेळांचा समावेश करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
‘फिट संभाजीनगर’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विविध क्रीडा व फिटनेस उपक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मॅरेथॉन, सायकलिंग, झुंबा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पारंपरिक खेळांचे विशेष आयोजन करण्यात यावे, तसेच विविध क्रीडा प्रकारातील तज्ज्ञ व प्रशिक्षकांना सहभागी करून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा व उपक्रम आयोजित करावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
शहरातील खेळाडू, क्रीडा संघटना, प्रशिक्षक आणि नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘फिट संभाजीनगर’च्या माध्यमातून शहराला अधिक निरोगी, सक्रिय आणि क्रीडाप्रेमी बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मनपा क्रीडा विकासाला नवी दिशा...!
आज आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा क्रीडा समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रीडा विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये मनपा क्रीडा प्रबोधिनी सुरू करणे, मनपा क्रीडा पुरस्कार सुरू करणे, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, विविध क्रीडा मैदाने विकसित करणे, मनपा क्रीडा महोत्सव व राज्य क्रीडा महोत्सव आयोजित करणे, मॅरेथॉन, हेरिटेज वॉक तसेच गोगाबाबा ते दौलताबाद ट्रेकिंग यांसारखे उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.
तसेच ‘फिट छत्रपती संभाजीनगर’ उपक्रमांतर्गत विविध खेळांचे प्रात्यक्षिक, जनजागृती स्टॉल्स, फन गेम्स, योगा, झुंबा, मल्लखांब, फेन्सिंग, कराटे, वेटलिफ्टिंग व बॉडीबिल्डिंग आदी उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
बैठकीस आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेविका सीमा साळवे, नगरसेवक मनोज गांगवे, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे, मनपा क्रीडा समन्वयक सागर मगरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?