उच्च न्यायालय, लिपिक भरती परीक्षेचा गोंधळ अखेर संपला, टायपिंग परीक्षा रद्द पुन्हा होणार परीक्षा

 0
उच्च न्यायालय, लिपिक भरती परीक्षेचा गोंधळ अखेर संपला, टायपिंग परीक्षा रद्द पुन्हा होणार परीक्षा

न्यायालय लिपिक भरती परीक्षेचा गोंधळ अखेर संपला; टायपिंग परीक्षा रद्द...

11,617 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय; सोमवारी होणारे आमरण उपोषण स्थगित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 29 (डि-24 न्यूज) – मुंबई उच्च न्यायालयाच्या (BHC) लिपिक (Clerk) पदासाठी 16 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग चाचणी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक व प्रशासकीय गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकारामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्यावर आणि परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत न्यायालय प्रशासनाने 16 ऑगस्ट रोजी झालेली टायपिंग परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सोमवारी पुकारण्यात आलेले आमरण उपोषणही स्थगित करण्यात आले आहे.

या अन्यायाविरोधात आणि परीक्षार्थींच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावित विद्यार्थी ॲड. अक्षय नारायण झिरपे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. निबंधकांची प्रत्यक्ष भेट घेऊन अधिकृत निवेदन साद केले होते. या निवेदनाद्वारे परीक्षेतील तांत्रिक व प्रशासकीय गोंधळाचा गांभीर्याने विचार करून एकूण 11,617 विद्यार्थ्यांची टायपिंग परीक्षा पुन्हा पारंपरिक पद्धतीने घेण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.

उमेदवार अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत होते. मात्र, 16 ऑगस्ट रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. या आंदोलनाची आणि विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत न्यायालय प्रशासनाने 29 ऑगस्ट रोजी परीक्षा रद्द करण्याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश...

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने सोमवारी करण्यात येणारे आमरण उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा ॲड. अक्षय नारायण झिरपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्यांनी 16 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठबळ देणारे काकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार तसेच आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष किर्दक यांचे आभार मानले.

‘तांडव विद्यार्थी संघटना’ स्थापनेची घोषणा...

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापुढेही लढा देण्याच्या उद्देशाने ‘तांडव विद्यार्थी संघटना’ स्थापन करण्याची घोषणाही ॲड. अक्षय नारायण झिरपे-पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन व संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या न्यायालय प्रशासनासह विविध संस्थांच्या संचालकांचेही त्यांनी आभार मानले. लिपिक भरती परीक्षेचा गोंधळ अखेर दूर झाल्याने आता नव्याने होणारी परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पद्धतीने घेण्यात यावी, अशी अपेक्षा परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow