उद्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पाचवा दिक्षांत समारंभ...
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पाचवा दीक्षान्त समारंभ 1 नोव्हेंबरला
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रमुख पाहुणे : 171 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचा पाचवा दीक्षान्त समारंभ रविवार, 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता कांचनवाडी येथील विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात एकूण 171 विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
या दीक्षान्त समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती प्रसन्ना बी. वराळे समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विधी विद्यापीठाचे प्र-कुलपती महेश चंद्र त्रिपाठी, कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे रवींद्र के. घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य संतोष जी. चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. (डॉ.) बिंदू रोनॉल्ड, कुलसचिव प्रा. (डॉ.) धनाजी एम. जाधव यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग उपस्थित राहणार आहे.
या दीक्षान्त समारंभात बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स) अभ्यासक्रमाच्या 45, बी.बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स – लॉ ऑफ मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाच्या 03, एलएल.एम. अभ्यासक्रमाच्या 114 आणि पी.एच.डी.ची 09 अशा एकूण 171 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
या समारंभास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील न्यायमूर्ती, वकील मंडळी, विविध प्रतिष्ठित मान्यवर, विद्यापीठाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या या पाचव्या दीक्षान्त समारंभासाठी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे उप-कुलसचिव डॉ.निवृत्ती एम. गाजभारे यांनी केले आहे.
What's Your Reaction?