उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत पंपिंग सुरू झालीच पाहिजे, आयुक्त अमोल येडगे यांची तंबी...!

 0
उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत पंपिंग सुरू झालीच पाहिजे, आयुक्त अमोल येडगे यांची तंबी...!

उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत पंपिंग सुरू झालीच पाहिजे: आयुक्त अमोल येडगे यांचे कडक निर्देश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - "कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान पाणी पुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे. कामात आता कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत," अशा कडक शब्दांत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना आज तंबी दिली.

आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठ्याचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने सध्या बंद असलेली पंपिंग आणि जॅकवेल मेंटेनन्सच्या कामावर चर्चा करण्यात आली.

रात्रीच 'प्लॅनिंग' करा, सकाळी काम फत्ते करा...!

बैठकीत आयुक्तांनी कामाचा वेग वाढवण्यासाठी थेट 'ॲक्शन प्लॅन' दिला. "आज संध्याकाळीच एजन्सी, एमजेपी (MJP) चे अधिकारी आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. रात्रीच नवीन व्हॉल्व बदलून पंपिंग सुरू करण्याचे नियोजन करावे. जर रात्री प्रकाशाअभावी काम करणे शक्य नसेल, तर उद्या सकाळी सूर्योदय होताच काम सुरू करा. पण उद्या दुपारी 12 च्या आत पंपिंग सुरू झालीच पाहिजे," असे आदेश आयुक्तांनी दिले.

'डेडलाईन' संपली, आता कारणे नकोत!

बैठकीदरम्यान एजन्सीच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे काम रेंगाळण्याची व विलंबाची कारणे देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एजन्सीला फटकारले. "तुमची डेडलाईन आधीच संपली आहे, त्यामुळे आता मला कोणतीही कारणे सांगू नका. आधी काम पूर्ण करा," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी एजन्सीला सुनावले. तसेच 'एप्रोच चॅनेल'चे कामही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नवीन व्हॉल्व आणि 5 दिवसांची मुदत

आयुक्तांनी पुढील कामांचे नियोजन करताना खालील महत्त्वाचे निर्देश दिले:

ऑर्डर ट्रॅकिंग नवीन व्हॉल्वच्या ऑर्डरची तपासणी करावी आणि ते वेळेतच येतील याचे चोख नियोजन करावे.

जबाबदारी ज्या ज्या ठिकाणचे व्हॉल्व खराब आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची राहील.

5 दिवसांची मुदत नवीन व्हॉल्व आल्यानंतर ते बदलण्याचे काम पुढील 5 दिवसांतच पूर्ण करावे. नवीन व्हॉल्व आल्यानंतर त्यासाठी रीतसर 'शट डाऊन' घेतला जाईल.

बैठकीला अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या आढावा बैठकीला विशेष कार्यकारी अधिकारी ए.बी. देशमुख, के.एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, सर्व कनिष्ठ अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, तसेच GVPR चे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय आणि एमजेपी चे राम नारायण आदी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow