काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल...!
काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याच्या धमक्या; पोलिस आयुक्तांकडे तक्रार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम सय्यद अब्बास यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार देत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, 10 जुलैच्या सायंकाळपासून त्यांच्या मोबाईलवर सातत्याने जीवे मारण्याच्या धमकीचे संदेश येत असून, त्यामध्ये त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अॅड. सय्यद यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शहराध्यक्षपदी नियुक्तीनंतर त्यांनी स्मार्ट मीटर, नीट परीक्षा पेपरफुटी, इंधन दरवाढ तसेच राममंदिर परिसरातील कथित चंदा चोरीसारख्या विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलने केली होते. या आंदोलनांचा राग मनात धरूनच धमक्या दिल्या जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
धमक्यांमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. मोबाईलवर धमकीचे संदेश असलेल्या स्क्रीनशॉटची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे. डिसीपी शशिकांत सातव यांची भेट घेऊन त्यांनी लेखी तक्रार दिली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सुध्दा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने लेखी तक्रार देऊन चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एड सय्यद अक्रम यांनी केली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि राहणार.
What's Your Reaction?