जादूटोणाविरोधी कायद्याचे जनजागरण व अंमलबजावणी करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला अंधश्रध्देच्या विळख्यातून वाचवावे - श्याम मानव
जादूटोणाविरोधी कायद्याचे जनजागरण व अंमलबजावणी करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवावे- श्याम मानव
बुलढाणा,दि.21(डि-24 न्यूज)- संत आणि समाज सुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा असताना आज अशोक खरात सारखे भोंदू बुवा बाबा आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या असून त्यास मोठ्या संख्येने स्त्रिया व पुरुष बळी पडत आहे. आजही जनतेचे शारीरिक, मानसिक,
आर्थिक आणि लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. याचे कारण या फडणवीस सरकारची या कायद्याचे जनजागरण आणि अंमलबजावणीत हेतू पुरस्पर उदासीनता असून मुख्यमंत्र्यांनी हे पाप न करता जादूटोणाविरोधी कायद्याचे जनजागरण व प्रभावी अंमलबजावणी करुन जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवावे असे आवाहन बुवाबाजीचे कर्दनकाळ अंनिसचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांनी केले.
बुवा तिथे बाया या बुवाबाजी विरोधात राज्यव्यापी जनजागरण अभियानात बुलढाणा येथे श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या जाहीर व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक खरात तर विचारपिठावर प्रमुख उपस्थितीत संदीप शेळके, इंदुमती लहाने अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ, जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर, दत्ताभाऊ सिरसाट, महिला संघटक प्रतिभा भुतेकर, उपाध्यक्ष स्वाती सावजी, सचिव आशिष गवई हे होते. अभियानाच्या प्रास्ताविकात सुरेश झुरमुरे यांनी अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाधर्माला विरोध नसून त्याच्या नावावर जनसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्यांच्या विरोधात हा जनजागरणाचा लढा गत 44 वर्षापासून सुरु असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मानव म्हणाले, की जर सरकारने हे जनजागरण व अंमलबजावणी कार्य केले असते तर पुरोगामी महाराष्ट्रातील जनजागरण करणाऱ्या संतांच्या व समाज सुधारकांच्या स्वप्नातील विवेकी समाजाची निर्मिती करणे सोपे झाले असते. हे पुण्य करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना अजूनही सहज उपलब्ध आहे. त्याचा त्यांनी सदुपयोग करून आपल्या कार्यकाळात जनसामान्यांच्या हितासाठी या कायद्याचे खरंच मनापासून जनजागरण आणि प्रभावी अंमलबजावणी करावी,असे आवाहन केले.
विशेष म्हणजे तापमानाचा पारा वाढलेला असताना मोठ्या संख्येने उपस्थित महिला व पुरुष प्रेक्षकांनी उकाडा सहन करुन 3 तास पूर्ण कार्यक्रम एकाग्रतेने ऐकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मनोहर तुपकर संचालन संजय खांडवे तर आभार प्रदर्शन प्रमोद टाले यांनी केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी अभय पाटील, विवेक हिवाळे, सुमेध जाधव, विजय शिरसाठ, गिरीश सरसांडे, गजानन पडोळ अंजली गाढे, करुणा घोडेस्वार, नानाभाऊ मोरे, प्रशांत शिंदे, देविदास वले, नितीन बाहेकर आदींसह बुलढाणा अ.भा. अंनिसने अथक परिश्रम घेतले.
What's Your Reaction?