मार्कोनी लिखित "तोहफतूल हदीस" पुस्तकाचे थाटात प्रकाशन...!

 0
मार्कोनी लिखित "तोहफतूल हदीस" पुस्तकाचे थाटात प्रकाशन...!

मार्कोनी लिखित “तोहफतुल हदीस” पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन...

संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- समाजात नैतिक मूल्ये, मानवता आणि शांततेचा संदेश पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांच्या “तोहफतुल हदीस” या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भरगच्च सभागृहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन "वारीसान ए हर्फ व कलम", "दारुल क़िराअत कलिमीया", औरंगाबाद आणि 'इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमी" यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन शेख-उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मख़दूम फारुक़ी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना डॉ. सदरुलहसन नदवी मदनी, मौलाना डॉ. अब्दुल रशीद नदवी मदनी, आर्किटेक्ट डॉ. अरशद अहमद, मेजर सईदा फरासत, डॉ. शाझिया नहरी, प्राचार्य नफीसा बाजी, डॉ. अनवरुल्लाह क़ादरी, सय्यद शाहिद हमीद, डॉ. अझहर सिद्दीक़ी, शम्सुल हसन, मौलाना मोहीबउल्लाह, ख्वाजा शहाब व शिक्षातज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अबुबकर रहबर यांनी प्रभावीपणे केले.

क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी हे इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमीचे प्रमुख असून ते औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कुरआनचे भाषांतर शिकवण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी हदीस शिक्षणालाही सुरुवात केली असून “परलोकात यश मिळवण्यासाठी कुरआन आणि हदीस दोन्हींचे ज्ञान आवश्यक आहे” या विचारातून त्यांनी “तोहफतुल हदीस” हे पुस्तक लिहिले आहे.

    कार्यक्रमादरम्यान इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमीतून कुरआन भाषांतराचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी दारुल उलूम देवबंद येथून “फाज़िल-ए-दिनियात” ही पदवी मिळवलेल्या २५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक डिग्री प्रदान करण्यात आली.

     मान्यवरांनी आपल्या भाषणात कुरआन समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार जीवन जगण्यासाठी हदीसचे महत्त्व स्पष्ट केले. कुरआन हा अल्लाहचा संदेश असून, त्या संदेशानुसार कसे आचरण करावे हे प्रेषित मोहम्मद (स.) यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले, असे त्यांनी नमूद केले.

     “तोहफतुल हदीस” या पुस्तकामध्ये मानवता, परस्पर प्रेम, शांतता, योग्य व्यवहार, इबादत, शेजाऱ्यांचे हक्क तसेच मत्सर आणि गैरसमज दूर करण्यासारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच हलाल-हराम याबाबत योग्य जाणीव करून देत समाजात बंधुभाव वाढवणे आणि देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान देण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे.

     कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना “तोहफतुल हदीस” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ख्वाजा शहाब यांनी केले.

      एकूणच, हा कार्यक्रम ज्ञान, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा संगम ठरला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow