रविवारी बामसेफचे राज्य अधिवेशन, विविध सामाजिक प्रश्नांवर होणार मंथन....
रविवारी बामसेफचे 40वे राज्य अधिवेशन; विविध सामाजिक प्रश्नांवर होणार मंथन
ईव्हीएम बंदी, जातनिहाय जनगणना, टीईटी-नीट परीक्षांतील गोंधळासह विविध विषयांवर चर्चा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22 (डि-24 न्यूज) -: ऑल इंडिया बॅकवर्ड (एससी, एसटी, ओबीसी) अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन अर्थात बामसेफचे 40 वे राज्य अधिवेशन रविवारी पडेगाव परिसरातील राजयोग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ईव्हीएम बंदी, जातनिहाय जनगणना, टीईटी व नीट परीक्षांमधील गोंधळ, स्वतंत्र मतदारसंघ, जातनिहाय वर्गीकरण यासह विविध सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती बामसेफचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता प्रसिद्ध आंबेडकरी शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते होणार असून, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडणार आहे. उद्घाटन सत्राला डॉ. विजय मुन, मिलिंद टिपणीस, सुरेश खोपडे, उत्तम सोनकांबळे, सुमेध तरोडेकर, हरविंदर सिंग खालसा, जर्नादन चंगले, प्रा. त्र्यंबक कदम, ॲड. बबन मुठाळ, गौतम गवई, डॉ. सूरज पवार, शिवाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातून या अधिवेशनासाठी जवळपास 10 हजार प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात ईव्हीएम बंदी, जातनिहाय जनगणना, टीईटी व नीट परीक्षांतील गोंधळ, स्वतंत्र मतदारसंघ, जातनिहाय वर्गीकरण तसेच बहुजन, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांबाबत मंथन करण्यात येणार आहे.
याशिवाय अधिवेशनात विविध ठराव मांडले जाणार असून, संघटनेची आगामी दिशा आणि सामाजिक आंदोलनांची रूपरेषा यावरही चर्चा होणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. अधिवेशनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवे यांनी केले.
पत्रकार परिषदेला ॲड. सुजाता चौदंते, भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा ज्योती मिसाळ, बामसेफचे पुणे विभागीय कार्यकर्ते प्रा. मनोज लोहे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?