विवाहपूर्व संवाद केंद्रातून 76 जोडप्यांच्या सुखी संसाराची पायाभरणी

 0
विवाहपूर्व संवाद केंद्रातून 76 जोडप्यांच्या सुखी संसाराची पायाभरणी

विवाहपूर्व संवाद केंद्रातून 76 जोडप्यांच्या सुखीसंसाराची पायाभरणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- विवाहपूर्व संवाद केंद्र जिल्ह्यात दि.1 मे 2025 पासून कार्यान्वित करण्यात आले. विवाह ठरवितांना प्रत्यक्ष वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडीअडचणींबाबत वास्तववादी भान यावे यासाठी हा संवाद घडविला जातो. यात केवळ वधुवर नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही संवाद घडविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या या केंद्रात आतापर्यंत 76 जोडप्यांच्या संवादातून त्यांच्या सुखी संसाराची पायाभरणी करण्यात आली. 

 जिल्ह्यात 1 मे रोजी विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आले. विवाहेच्छु मुला मुलींमध्ये विवाह निश्चिती करतांना भावी आयुष्यातील संभाव्य प्रसंगांबाबत त्यांना पूर्व कल्पना देऊन भावी जीवनाची स्वप्ने रंगवतांना वास्तवाचे भान दिले जाते.

 विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापनेमागील हीच भुमिका आहे. याद्वारे वर-वधू, त्यांचे आईवडील, नातेवाईक यांच्या विविध शंकाचे समाधान होत आहे. भावी आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणींची पूर्व कल्पना दिली जाते. त्यामुळे वास्तवाची जाणीव होत असल्याने हा संवाद फलदायी ठरत असल्याचे समाधान कुटुंबीय व्यक्त करत आहेत. 

 संवादाच्या माध्यमातून ओळख, आवडीनिवडी, भविष्यातील नियोजन, घरातील इतर मंडळींचा स्वभाव, त्यांच्याशी करावयाचा संवाद याबाबत खुलेपणाने चर्चा होते. यामध्ये सासू-सासरे, आई-वडील यांच्या शंकांचे निरसन या संवाद केंद्राच्या माध्यमातून केले जाते. मुलीला सासरी गेल्यावर कोणताही त्रास होऊ नये हीच अपेक्षा वधू मुलींच्या आई वडिलांची असते. तर सासरकडच्या मंडळींची अपेक्षा ही सुखात संसार असावा व भविष्याचे नियोजन व्यवस्थित केलेले असावे अशा अपेक्षा असतात. बऱ्याचदा वर वधू हे आई-वडील, नातेवाईकांमध्ये बोलू शकत नाही त्यांच्याशीही येथील अधिकारी- कर्मचारी कुशलतेने संवाद साधतात. सुखी भविष्याची ग्वाही घेऊन या संवाद केंद्रातून भावी जोडीदार नवीन स्वप्न घेऊन बाहेर पडतात, तेव्हा या स्वप्नांना वास्तवाचे भान आलेले असते. 

  संपर्कासाठी श्रीमती गीता अंभोरे समुपदेशक, विवाहपूर्व संवाद समुपदेशन केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर तळमजला. संपर्क क्रमांक 9604134676 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे या संवाद केंद्राकडे काटेकोर लक्ष आहे. त्यांनी नुकतीच या विवाहपूर्व संवाद केंद्रास भेट दिली. हा जिल्ह्यातील एक अभिनव उपक्रम असून भविष्यातील होणाऱ्या विसंवाद टाळण्यासाठी या संवाद केंद्राचा उपयोग होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

संवाद केंद्रात आलेल्या वर रोहित राजू बिंदिछोडे आणि वधू अनुश्री चंद्रकांत गायके यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow