समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा होणार गणेशोत्सव - अध्यक्ष राजेंद्र जंजाळ
समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा होणार यंदाचा गणेशोत्सव
अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती
औरंगाबाद दि.18(डि-24 न्यूज) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाचा श्री गणेश उत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, विनोद पाटील, अभिजीत देशमुख, राजेंद्र दाते पाटील, विशाल दाभाडे, संदीप शेळके, हरीश शिंदे, शेखर जाधव यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अध्यक्ष जंजाळ म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्यांदाच श्री गणेश महासंघ समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात आणि थाटात करण्यात आले. गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणे ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. यंदाचे हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हेच औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येणार. श्री गणेश उत्सव सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांनीही साजरा करण्यात येणार असून यामध्ये प्रसिद्ध हास्य कवी मिर्झा बेग यांचे हास्य कवी संमेलन, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे,भव्य कुस्ती स्पर्धा
भव्य ढोल पथकांची स्पर्धा यासह श्री गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपले कर्तव्य नवरात्र बजावणाऱ्या सर्व पोलिसांना घरचा डब्बा आणि पाण्याची बॉटल देणार असल्याचे अध्यक्ष जंजाळ म्हणाले. गणेश मंडळाची वाढती संख्या लक्षात घेता श्री गणेश महासंघाच्या वतीने ज्याही अडचणी गणेश मंडळांना येतील त्या सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना
यंदाचा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती सज्ज झाली असून महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना मंगळवारी (दि.19) सकाळी 11 वाजता निराला बाजार, येथील मोतीवाला कॉम्प्लेक्स च्या केएफसी बिल्डींग मध्ये असलेल्या श्री गणेश महासंघाच्या संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येत असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी दिली. जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, यांची विशेष उपस्थिती राहील
लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.
What's Your Reaction?