अपात्र नगरसेवकांच्या निर्णयाकडे लागले शहराचे लक्ष, 18 नगरसेवकांच्या विरोधातील तक्रारीवर झाली सुनावणी...!

 0
अपात्र नगरसेवकांच्या निर्णयाकडे लागले शहराचे लक्ष, 18 नगरसेवकांच्या विरोधातील तक्रारीवर झाली सुनावणी...!

अपात्र नगरसेवकांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष; 18 नगरसेवकांच्या विरोधातील तक्रारींवर सुनावणी पूर्ण...

प्रत्येक सुनावणीत नगरसेवकांकडून वेळ वाढवून घेण्याची मागणी; ‘तारीख पे तारीख’मुळे तक्रारदारांची चिंता वाढली

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 24 (डि-24 न्यूज) : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, तीन अपत्ये असणे तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आदी कारणांवरून नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या तक्रारींवर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत 18 नगरसेवकांविरोधातील तक्रारींवर सुनावणी झाली असून, दोन्ही सुनावण्यांमध्ये संबंधित नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनीही त्यांना वेळ देण्यास मंजुरी दिली आहे.

प्रत्येक सुनावणीत नगरसेवकांकडून वेळ वाढवून घेण्यात येत असल्याने तक्रारदारांची चिंता वाढली आहे. ‘तारीख पे तारीख’ सुरू राहिल्यास या प्रकरणांवर अंतिम निर्णय कधी होणार आणि पुढील प्रक्रिया कधी सुरू होणार, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

25 नगरसेवकांविरोधात तक्रारी

महानगरपालिका निवडणुकीनंतर एमआयएमच्या 18, भाजपच्या 6 आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका अशा एकूण 25 नगरसेवकांविरोधात महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे विविध कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

यापैकी 17 ऑगस्ट रोजी 9 नगरसेवकांविरोधातील तक्रारींवर सुनावणी झाली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी 9 नगरसेवकांच्या तक्रारींवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत 18 नगरसेवकांच्या तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे.

प्रत्येक नगरसेवकाची स्वतंत्र सुनावणी

मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी उपायुक्त विकास नवाळे आणि उपायुक्त अपर्णा थेट उपस्थित होत्या. सुनावणीसाठी संबंधित 9 नगरसेवक तसेच तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. प्रत्येक नगरसेवकाची स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात आली.

काही नगरसेवकांनी आपल्या बाजूने वकीलही नियुक्त केले होते. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संबंधित नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी तसेच तक्रारदारांनी सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास करून आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती आयुक्तांकडे केली.

त्यावर आयुक्त अमोल येडगे यांनी वेळ देण्यास मान्यता दिली असून, पुढील सुनावणीची तारीख नंतर कळविण्यात येईल, असे सांगितले.

मंगळवारी या नगरसेवकांविरोधात सुनावणी

मंगळवारी शेख नर्गिस सलीम, मोहम्मद वसीम अलीम अहमद आणि फेरोज खान मोईनुद्दीन खान यांच्याविरोधात तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून दाखल तक्रारींवर सुनावणी झाली.

मोहम्मद वाजेद मोहम्मद अय्युब आणि मेराज खान जलील खान यांच्याविरोधात अतिक्रमणास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरून दाखल तक्रारींची सुनावणी झाली.

तर सय्यद सोहेल सय्यद महेमूद हसन, अब्दुल समीर अब्दुल साजेद, जीवकपाल हिवराळे आणि भारती सोनवणे यांच्याविरोधात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपांवरून दाखल तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये पुढील सुनावणी?

17 ऑगस्ट रोजी झालेल्या 9 नगरसेवकांविरोधातील सुनावणीतही संबंधित नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता या प्रकरणांवर सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात पुढील सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर वेळ वाढवून दिला जात असल्याने तक्रारदारांमध्ये नाराजी आहे. ‘तारीख पे तारीख’चा खेळ असाच सुरू राहिला तर अंतिम निर्णय कधी लागणार आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया कधी सुरू होणार, असा सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे.

बांधकाम स्वतःहून पाडले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांविरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून नोटीस मिळण्यापूर्वीच संबंधित नगरसेवकांनी आपले अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घेतल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचेही तक्रारदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित नगरसेवकांनी अनधिकृत बांधकाम केले होते, हे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय, इतर काही नगरसेवकांच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवालही सादर केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अधिक वेळ न दवडता उपलब्ध पुरावे आणि अहवालांच्या आधारे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

आता उर्वरित नगरसेवकांविरोधातील तक्रारींवर सुनावणी कधी होते आणि 18 नगरसेवकांच्या प्रकरणांमध्ये महापालिका आयुक्त कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow