डॉ.राजेंद्र दाते पाटील यांचे 16 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, घाटी रुग्णालयात दाखल...!
डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांचे 16 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 24 (डि-24 न्यूज) : शाश्वत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर सुरू असलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर 16 व्या दिवशी स्थगित करण्यात आले. मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आणि दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर डॉ. दाते-पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उपोषणामुळे डॉ. दाते-पाटील यांची प्रकृती खालावली असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
मागण्यांबाबत शासन सकारात्मक
उपोषणाच्या काळात मंत्री नितेश राणे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार कल्याण काळे, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार रोहित पवार यांनी दूरध्वनीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, त्या शासन स्तरावर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेची पुनर्तपासणी
मराठवाड्यातील ज्या मराठा समाजातील व्यक्तींकडे कुणबी नोंद अथवा वंशावळ उपलब्ध नाही, त्यांना हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे जातप्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबाबत शासन निर्णय आणि एसओपीची घटनात्मक पातळीवर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत जातप्रमाणपत्रासाठी उपलब्ध नोंद आणि वंशावळ सिद्ध करावी लागणार आहे.
384 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जलसमाधी घेऊन बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्यासह आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व 384 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कायगाव येथे ‘मराठा क्रांती हुतात्मा स्तंभ’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सुरू आहे.
हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा
आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय असलेली आर्थिक मदत देण्यासाठी पुढील 15 दिवसांत प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तालयामार्फत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती विभागीय उपायुक्त डॉ. मंजुषा मिसकर यांनी दिली.
यासंदर्भातील लेखी पत्रही डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांना देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांची उपस्थिती
यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, राजेश मुंढे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. शिवानंद भानुसे, लक्ष्मणबापू शिरसाठ, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, मुकुंद सोनवणे, मसूद शेख, साजिद पटेल, शेख मुख्तार, शेख खुर्रम, गुड्डू निकाळजे, संदीप पाटील, अमित जाधव, निखिल काकडे, विजय काकडे, आर्यन दाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल
सलग 16 दिवसांच्या अन्नत्यागामुळे डॉ. दाते-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले असले, तरी मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नसल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पुढील काळात शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
शासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत अथवा मराठा क्रांती मोर्चाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, तर मंत्रालयात घुसून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला.
What's Your Reaction?