आधी मोबदला नंतर कार्यवाई करा, आयुक्तांकडे हर्सुलकरांची मागणी...

आधी मोबदला नंतर घ्या मालमत्ता, हर्सुलकरांची मागणी...
हर्सूल-सावंगीतील नागरिकांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट भेट घेवून चर्चा... बांधकाम परवानगी नसेल तर ते पाडणारच - आयुक्तांची भुमिका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
शनिवारी हर्सुल गावात मनपाची गाडी आली होती सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करणार असल्याचे सांगताच येथील नागरीक भयभित झाले होते झोप उडाली होती. यानंतर माजी उपमहापौर विजय औताडे यांनी रविवारी आयुक्त जी.श्रीकांत यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली.
आज दुपारी स्मार्ट सिटी कार्यालयात बाधित 300 नागरीकांनी भेट घेवून चर्चा केली. आपले म्हणने मांडल्यानंतर आयुक्तांनी शब्द दिला मोबदला व टिडीआर देण्यात येईल परंतु अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाई केली जाईल. वक्फ व इनामी जमीनीच्या मोबदल्यावर संबंधित विभागाशी संपर्क करुन निर्णय घेतला जाईल. धार्मिक स्थळांबाबत संबंधित कमिटी व ट्रस्टींना विश्वासात घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. अगोदर कागदपत्रांची तपासणी यानंतर मार्कींग करुन कार्यवाही केली जाईल. घरांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली आहे व्यवसायिक मालमत्तांवर अगोदर कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी G-20 च्या वेळेस आमच्या गावातील 30 मीटर जागा घेतली होती. तेव्हा आधी मोबदला दिला त्या नंतर जागा घेतली. संपादित केलेल्या जागेपैकी अर्धीच जागा वापरली आहे, अर्ध्या जागेत अद्यापही रस्ता केलेला नाही, याकडे लक्ष वेधत हर्सूल, सावंगीतील नागरिकांनी विकासाला आमचा विरोध नाही, पण आधी मोबदला द्यावा, अशी मागणी केली.
रविवारी हर्सूलमधील काही राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीनशे नागरिकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत, बांधकाम परवानगी नसेल तर आम्ही कारवाई करून अनधिकृत बांधकाम पाडणार, मोहिम थांबविणार नाही, तसेच जागा संपादित करताना मोबदला देवू, असे स्पष्ट सांगितले.
हर्सूल, सावंगी व परिसरात महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घ्या, असेही आवाहन शनिवारी करण्यात आले. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि दहशतीचे वातावरण पसरले होते. या भागातील माजी उपमहापौर विजय औताडे, बाळासाहेब औताडे, गणेश औताडे, विजय औताडे, रमेश सुरे, अनिस पटेल, युनूस पटेल, अयुब पटेल, आबासाहेब औताडे, लक्ष्मण दुबे, प्रमोद औताडे यांच्यासह नागरीकांनी भेट घेतली. यावेळी आयुक्तांशी चर्चा केली.
याअगोदर रस्ता रुंदीकरणासाठी भुसंपादन करुन मोबदला दिला त्यानंतर मालमत्ता ताब्यात घेतली आताही आणखी जागा घेण्यात येणार आहे. त्याबाबत मनपाच्या वाहने काल परिसरात घोषणा करत फिरत होती. आता आणखी शंभर फुट रस्ता रुंद केल्यास आमच्या शिल्लक मालमत्ताही जातील. जागाच शिल्लक राहणार नाही. आम्ही रस्त्यावर येवू., याचाही विचार करावा., अशी विनंती करत आम्ही जागा देण्यास तयार आहोत, मात्र आधी मोबदला द्यावा., अशी मागणी नागरिकांनी केली.
आधी रितसर मार्किंग होईल नंतरच होईल कारवाई - आयुक्त जी.श्रीकांत
कारवाई करण्याआधी रितसर मार्किंग करण्यात येईल. त्यानंतर अनधिकृत मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येतील. निवासी मालमत्तांना न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यांना आम्ही हात लावणार नाही, व्यावसायिक मालमत्ता पाडण्यात येतील. त्यामुळे मार्किंगनंतर बांधकाम स्वत:हून काढून घेण्यास वेळ देण्यात येईल. तसेच आज तुमच्या जागा महापालिका ताब्यात घेत नाही जेव्हा जागा ताब्यात घेण्यात येईल, तेव्हा तुम्हाला कायदेशीर प्रक्रीया करुन मोबदलासुद्धा देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्तांनी नागरिकांना दिले.
What's Your Reaction?






