ई-रिक्षा नोंदणीसाठी चारित्र्य पडताळणी, चालक परवाना व बॅज अनिवार्य...
ई-रिक्षा नोंदणीवेळी चारित्र्य पडताळणी, चालक परवाना व बॅज अनिवार्य – परिवहन आयुक्तांचे स्पष्ट निर्देश
मुंबई, दि.7(डि-24 न्यूज)-
महाराष्ट्रात ई-रिक्षा नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे व सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. ई-रिक्षा नोंदणी करताना चालकाची पोलिस चारित्र्य पडताळणी, वैध चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) व अधिकृत बॅज अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-रिक्षांना परवाना आवश्यक नसल्याचा गैरफायदा घेत एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त ई-रिक्षांची नोंदणी तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या नावावरही ई-रिक्षा नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
मोटार वाहन कायदा, 1988 व त्याअंतर्गत नियमांनुसार कोणतेही सार्वजनिक सेवा वाहन चालविण्यासाठी वाहन चालकाकडे वैध लायसन्स व अधिकृत बॅज असणे बंधनकारक आहे. तसेच वाहन मालक व चालकाची पोलिस चारित्र्य पडताळणी करणेही अनिवार्य असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
काही प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्याने, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ई-रिक्षा किंवा कार्ट नोंदणी करताना सर्व नियमांचे आणि वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे सक्तीने पालन करण्यात यावे. आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या अर्जदारांची ई-रिक्षा नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही परिवहन आयुक्त कार्यालयाने दिला आहे. सह परिवहन आयुक्त संदेश चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे ई-रिक्षा व्यवस्थेत शिस्त येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?