एनएसयुआयच्या मागणीला यश, विद्यापिठाने बदलले परीक्षा केंद्र...!

 0
एनएसयुआयच्या मागणीला यश, विद्यापिठाने बदलले परीक्षा केंद्र...!

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने NSUI ने केलेल्या मागण्यांची दखल घेत एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - यापूर्वी एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी NSUI महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. शादाब अब्दुल रहेमान शेख यांची भेट घेऊन ICEEM वाळूज येथे देण्यात आलेले परीक्षा केंद्र त्यांच्या राहत्या परिसरापासून खूप दूर असल्याची तक्रार केली होती. तीव्र उष्णता, आर्थिक अडचणी, सलग परीक्षा आणि लांब अंतराचा प्रवास यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

तसेच शहरात आणि परिसरात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या अडचणींमुळे वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण होत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. शादाब शेख यांनी NSUI जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अभिषेक शिंदे यांनी डॉ. शादाब शेख यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासनाला निवेदन सादर करून विद्यार्थ्यांना जवळचे किंवा होम सेंटर देण्याची मागणी केली.

डॉ. शादाब शेख यांनी या प्रश्नासंदर्भात सिनेट सदस्य ज़हूर खालिद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ज़हूर खालिद यांनी विशेष प्रयत्न करत विद्यापीठ प्रशासनाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि परीक्षा केंद्र बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यानंतर डॉ. शादाब शेख, NSUI जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे, सिनेट सदस्य ज़हूर खालिद, एजाज शेख, झमान शेख, ऋषिकेश दुकले तसेच NSUI शिष्टमंडळ आणि विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या ठामपणे मांडल्या.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत NSUI च्या मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला.

यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी NSUI नेहमीच संघर्ष करत राहील, असे सांगितले. तसेच डॉ. शादाब शेख यांनीही NSUI ही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि हितासाठी सदैव लढत राहील, असे स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow