पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- डॉ.भागवत कराड
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
महानगरासह जिल्हयातील सद्यस्थितीचा घेतला आढावा
औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असून लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ सर्व संबंधित यंत्रणांनी पोहोचवण्यावर भर द्यावा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.
स्मार्ट सिटी कार्यालयात आज डॉ.कराड यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंदर्भात महानगरासह जिल्हयातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त जी.श्रीकांत, संजय खंबायते, बापू घडामोडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मनपाचे उपायुक्त मंगेश देवरे, नगर प्रशासन अधिकारी अशोक कायंदे यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, स्वनिधी से समृद्धी या संकल्पनेवर आधारित ही योजना आहे. “या योजनेअंतर्गत, नोंदणीकृत विक्रेत्यांना अत्यंत अल्प व्याजदराने 10 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. देशातील लहान विक्रेत्यांना अर्थसहाय्य पुरवून, त्यांना खासगी कर्ज पुरवठादारांच्या कचाट्यातून सोडवणे हे केंद्रसरकारचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे विक्रेते या गरजूंना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. महानगरासह जिल्हयातील पथविक्रेते, फेरीवाले यांना योजनेची माहिती देणे, त्यांची नोंदणी करणे यासाठी महानगरपालिका व बॅंकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.
डिजिटल व्यवहारात देश पुढे जात असल्याचे सांगून डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून कॅशबॅक सुविधा प्रदान करून विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जाते. डिजिटल माध्यमाने केलेल्या व्यवहारामुळे विक्रेत्यांच्या क्रेडिट स्कोरमध्येही वाढ होईल. प्रधानमंत्री स्वनिधी योजना योजनेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोठे लक्ष्य गाठण्यासाठी जनजागृती, तातडीने कर्ज वितरण, बँक अधिकाऱ्यांचा सहभाग, गरिब कुटुंबाला योजनेतून मदत, अर्ज भरण्याची प्रक्रिया यासह योजनेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाली.
महानगरातील योजनेच्या सद्यस्थितीबाबत उपायुक्त श्री देवरे यांनी तर जिल्हयातील स्थितीबाबत नगर प्रशासन अधिकारी श्री. कायंदे यांनी माहिती दिली. जिल्हयातील नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या शहरात सुरू स्वनिधी योजनेच्या स्थितीबाबत माहिती दिली.
यावेळी सबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?