एमआयएमच्या नगरसेवकावर मारहाणीचा आरोप, अवैध बांधकाम पाडताणाचे व्हिडिओ घेतल्याने वाद...
एमआयएम नगरसेवकावर मारहाणीचा आरोप; अवैध बांधकामाचा व्हिडिओ काढताना वाद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14 (डि-24 न्यूज) : हर्सूल प्रभाग क्रमांक १ मधील एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांच्यावर १४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिवराळे यांच्या घरावरील कथित अवैध बांधकामाची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हिवराळे यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावत, मुलासोबत झटापट झाली असून त्याला मारहाण केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रुपेश रुपचंद वाघमारे यांनी हिवराळे यांच्या घरावर अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच, या प्रकरणी हिवराळे यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी महापालिकेने हिवराळे यांना सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी हजर राहण्याचे पत्र दिले आहे.
दरम्यान, गुरुवारी हिवराळे यांच्या कथित अवैध बांधकामावर कारवाई सुरू असल्याची माहिती तक्रारदाराला मिळाली. या कारवाईचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यासाठी एका १४ वर्षीय मुलाला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हिडिओ काढत असताना मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलाची सुटका करून त्याला सुरक्षित बाहेर काढल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
‘सुनावणीपूर्वीच कारवाई का?’
रुपचंद वाघमारे यांनी सांगितले की, अपात्रतेच्या तक्रारीवर अद्याप सुनावणी झालेली नसताना अवैध बांधकाम पाडण्याची कारवाई का करण्यात आली, याची माहिती महापालिकेला देण्यात आली नाही. सुनावणीनंतर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल; मात्र, व्हिडिओ काढणाऱ्या मुलाला मारहाण करण्याची गरज नव्हती. मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करायची किंवा नाही, याचा निर्णय ते घेतील. त्यापूर्वी मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक हिवराळे यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, ‘डि-24 न्यूज’च्या प्रतिनिधीने नगरसेवक अशोक हिवराळे यांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेतली. हिवराळे यांनी सांगितले की, संबंधित मुलगा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. या झटापटीत मुलाच्या कपड्यांना नुकसान झाले आणि नखे लागली; मात्र, त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण केलेली नाही.
महापालिकेने सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी हजर राहण्याचे पत्र दिले असून, अवैध बांधकाम झाल्याबाबतचे स्वतंत्र पत्र आपल्याला मिळालेले नसल्याचेही हिवराळे यांनी सांगितले. एका खोलीचे बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एका मुलाने कुटुंबातील महिलांचा व्हिडिओ काढत असल्याचे समजले. तो पळून जात असताना त्याला पकडण्यात आले आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याचे कपडे फाटले व नखे लागली, असे स्पष्टीकरण हिवराळे यांनी दिले.
या प्रकरणात मुलाच्या पालकांकडून पोलीस तक्रार केली जाते का आणि महापालिका प्रशासनाच्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?