औरंगाबाद शहर बंद करण्याचा वंचितचा इशारा, काय आहे प्रकरण
 
                                वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना 24 तासांचा अल्टीमेटम – अन्यथा औरंगाबाद बंदचा इशारा!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30 (डि-24 न्यूज)-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावरून हेतुपुरस्सर खालच्या स्तरावरील आक्षेपार्ह व्हिडिओ सिरीज प्रसिद्ध करण्यात येत असल्याने वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.
"राजकारण विदर्भाचे" आणि "देवाभाऊ समर्थक" या फेसबुक पेजवरून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात व्हिडीओ मोर्फ करून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. हे व्हिडिओ समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्याचे वंचित आघाडीने म्हटले आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, तक्रार दिल्यानंतरही दुसरा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, अशी माहिती आघाडीने दिली.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला की, संबंधित फेसबुक पेजचे ॲडमिन व जबाबदार व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, तसेच सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ तात्काळ हटवावेत. अन्यथा 24 तासांच्या आत कार्यवाही न झाल्यास औरंगाबाद शहरातील सर्व बाजारपेठा, दुकाने व रस्ते बंद करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
या भेटीवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ, औरंगाबाद जिल्हा निरीक्षक योगेश गुलाबराव बन, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहर अध्यक्ष पंकज बनसोडे, मध्य शहर अध्यक्ष मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव मंगेश निकम, प्रवीण हिवाळे, रामदास वाघमारे, बाबासाहेब भारती, युवा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मुंजा तूपसमिंद्रे, जिल्हा संघटक रवी रत्नपारखे, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण जाधव, भाऊराव गवई, अजय मगरे, अमोल शिंदे, पंडित तुपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या इशाऱ्यामुळे औरंगाबाद पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील 24 तासांत पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            