काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे अकाली निधन,...!
काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे अकाली निधन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान यांचे सोमवारी उशिरा रात्री दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उशीरा रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला होता. डॉ.जफर अहेमद खान हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचे वय 55 वर्षे होते. या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढली होती. संजयनगर वार्डातून ते एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर असताना शहराच्या विकासात अमूल्य योगदान दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द होती. शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा त्यांचे योगदान आहे. कर्नाटक व राजस्थान राज्याचे प्रभारी म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक सेल व विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी शहरात धडकली यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात त्यांचा दफनविधी कार्यक्रम होईल अशी माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?