कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा - आमदार अंबादास दानवे

 0
कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा - आमदार अंबादास दानवे

कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करा...

शिवसेना नेते अंबादास दानवेंचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूक कोंडीच्या समस्येकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणींकडे जाणाऱ्या 4.5 किलोमीटरच्या घाट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. केवळ एप्रिल महिन्यात तब्बल 38 वेळा चक्काजाम झाल्याने पर्यटक, वाहनचालक आणि स्थानिक प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे विमान आणि रेल्वे प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत असून अनेक टूर ऑपरेटर्स अजिंठा लेणीला सहलींना वगळण्याचा विचार करत असल्याचेही दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोंडी सोडवण्यासाठी पोलिस प्रशासनावर मोठा ताण येत असून एकदा वाहतूक ठप्प झाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी किमान 90 मिनिटांचा कालावधी लागत आहे. घाटात नादुरुस्त होणाऱ्या ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग किंवा ‘वे’ उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित असल्याने हा प्रश्न अधिकच बिकट बनत असल्याचेही अंबादास दानवे यांनी लक्षात आणून दिली आहे.

पुढील काळात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत अजिंठा घाटातील सध्याची समस्या कायम राहिल्यास भविष्यात मोठा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून वनविभागाशी समन्वय साधावा, रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने मार्गी लावावे, घाटात कायमस्वरूपी क्रेनची व्यवस्था करावी तसेच नादुरुस्त वाहनांसाठी स्वतंत्र ‘वे' उभारावेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow