ग्रामीण आवास योजनेच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कामांना गती द्यावी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

 0
ग्रामीण आवास योजनेच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कामांना गती द्यावी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्यावी...

-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

विभागीय आयुक्तांकडून विभागाचा आढावा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 11 (डि-24 न्यूज): केंद्र व राज्य शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतला. फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील संबंधित यंत्रणांनी कामांना गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामीण आवास योजना व इतर महसूलच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर आयुक्त रिता मैत्रेवार, सुषमा देसाई, सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे उपस्थित होत्या. दुरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रमुख सहभागी झाले होते.

विभागातील अनेक ठिकाणी जागेअभावी घरकुलांची कामे रखडत असल्याचे निदर्शनास आल्याने, शासकीय, ग्रामपंचायतीच्या व अन्य उपलब्ध जागांचा योग्य वापर करून तातडीने अडचणी दूर करा तसेच मंजूर घरकुलांची कामे वेळेत सुरू करून पूर्ण करावीत तसेच त्याबाबतचे प्रगती अहवाल नियमित व अद्ययावत स्वरूपात सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी दिले.

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांशी थेट संवाद साधत कामातील अडचणी, निधीविषयक बाबी, तांत्रिक अडथळे व प्रशासकीय समस्या जाणून घेतल्या. या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हानिहाय सादर करण्यात आलेल्या अहवालांच्या आधारे मंजूर, पूर्ण व प्रलंबित घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी कामाची गती मंद आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्त पापळकर यांनी दिले.

घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत गुणवत्ता, पारदर्शकता व वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील गरीब, वंचित व गरजू कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने, जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

सन 2025-26 च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींची दुरुस्ती तसेच खरडून गेलेल्या जमिनींच्या पुनर्बांधणीसाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच बाधितांना फेब्रुवारीअखेर निधी वितरित करा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी दिले.

यावेळी सबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow