विभागीय आयुक्त कार्यालयात सेफर इंटरनेट कार्यशाळा संपन्न...
विभागीय आयुक्त कार्यालयात ‘सेफर इंटरनेट’ कार्यशाळा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.11 (डि-24 न्यूज)- विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त “स्मार्ट टेक, सेफ चॉईसेस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित व जबाबदार वापर” या संकल्पनेवर आधारित सुरक्षित इंटरनेट कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना इंटरनेट तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याबाबत जागरूक करणे, सायबर स्वच्छतेच्या उत्तम पद्धती अंगीकारणे तसेच सायबर धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे हा होता.
विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. उन्मेश सपकाळ यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेस वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त मंजुषा मिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार श्री. किसान भदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालये व तहसील कार्यालयांमध्येही अशाच स्वरूपाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढीस लागली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय माहिती-तंत्रज्ञान सक्षमीकरणाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले असून, मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याचा गौरव यापूर्वी मिळवला आहे.
सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल क्षमतावृद्धी संदर्भातील जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
What's Your Reaction?