घनकचरा व्यवस्थापन, नाविण्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब करून कार्यपध्दतीत सुधारणा करा - आयुक्त अमोल येडगे
घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रादेशिक विशेष प्रशिक्षण... नाविन्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब करून कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना- आयुक्त अमोल येडगे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG), मुंबई यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन–शहरी (SBM-U) 2.0 अंतर्गत ‘शाश्वत नागरी प्रशासनासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 ची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहराचे महापौर श्री. समीर राजूरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व शाश्वत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याच्या सूचना केल्या. घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना कार्यशाळेत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष कामकाजात उपयोग करून कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच देशातील इतर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रभावी घनकचरा व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा छत्रपती संभाजीनगर शहरात अवलंब करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचनाही आयुक्त येडगे यांनी केली.
कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण...
घनकचरा व्यवस्थापन नियमावली, 2026 अंतर्गत कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण, संकलन, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा अशा चार प्रकारात कचऱ्याचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. नागरिक तसेच संबंधित घटकांनी कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे योग्य वर्गीकरण केल्यास घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय बल्क वेस्ट जनरेटर (BWG) यांनी स्वतःच्या स्तरावर निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
नवीन नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन...
यावेळी उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रवासाचा संक्षिप्त आढावा घेतला. नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि उपाययोजनांबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?