जागतिक किडनी दिनानिमित्त शहरात भव्य किडनी दात्यांचा गौरव सोहळा संपन्न, डॉ.बर्नेला यांच्या डोळ्यात अश्रू अनावर...!
जागतिक किडनी दिनानिमित्त शहरात भव्य ‘दाता गौरव सोहळा’ संपन्न, डॉ.बर्नेला यांच्या डोळ्यात अश्रू अनावर... दहा वर्षांत 1100 हुन अधिक किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा अनुभव...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- जागतिक किडनी दिनानिमित्त, समाजातील खऱ्या नायकांचा म्हणजेच 'अवयव दात्यांचा' सन्मान करण्यासाठी संत एकनाथ रंगमंदिर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नामांकित डॉ. बर्नेला किडनी केअर, ओरियन सिटीकेअर हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा पाहून प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉ गणेश बर्नेला यांचे अश्रू अनावर झाले हे पाहून किडनी डोनर व त्यांचे नातेवाईक भावूक झाले होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी डोनर हा महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो आणि कुटुंबात आनंदाचे क्षण बघून मी डॉक्टर असलो तरी समाजाशी बांधिलकी असल्याने किडनी डोनरचा गौरव सोहळा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतला जातो. यामुळे अवयवदानाचे महत्व व गैरसमज दूर होऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे शिकायला मिळते. जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट आम्ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी करतो तेव्हा क्रीटीकल परिस्थितीत ईश्वर पण आमची परीक्षा घेतो असा अनुभव मागिल दहा वर्षांपासून येत आहे. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरीही शासकीय योजना व स्वयंसेवी संस्थांच्या सतत संपर्कात राहून रुग्णांचा ट्रान्सप्लांट कसे यशस्वी होईल हि परीक्षा असते. मागिल दहा वर्षांत 1100 हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट केले. सक्सेस रेट हा भारतात 99 टक्के आहे. नवनवीन संशोधन तंत्रज्ञान या विषयावर विकसित होत असल्याने किचकट शस्त्रक्रिया अधिक सोपे करण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे. पैशांची चिंता न करता रुग्णांनी किडनी आजार न वाढवता वेळोवेळी औषधोपचार करावे यासाठी शासनाचे आर्थिक सहाय्य मिळत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
अवयवदानाबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला 500 हून अधिक देणगीदार (Donors), किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक
या सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित राहून अवयवदानाच्या महत्त्वाची माहिती दिली:
याप्रसंगी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य अतिथी
महापौर श्री. समीर राजूरकर,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे,
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, आयएमचे सचिव डॉ. योगेश लक्कास, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,
ऑरीआॅन सिटी केअर हॉस्पिटलचे सिएमडी डॉ. आशिष देशपांडे, वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. शिरीष देशमुख,
एस एन डी एच हाॅस्पिटलचे सिईओ डॉ. अमोल कुलकर्णी, आणि एम आय टी हाॅस्पिटलचे सिईओ डॉ. संतोष
ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ह.भ.प. श्री प्रकाशानंद गिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड, नेवासा) यांनी आपला विशेष संदेश पाठवून 'जीवनदान' देण्याच्या या उदात्त कार्याचे कौतुक केले.
दात्यांच्या आरोग्याची जबाबदारी
केवळ सत्कार करून न थांबता, या कार्यक्रमात दात्यांच्या दीर्घकालीन आरोग्याला प्राधान्य देण्यात आले. सर्व दाते आणि रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त चाचण्या करण्यात आल्या.
"दात्यांचा सन्मान करणे ही केवळ सुरुवात आहे. उत्तम आरोग्याची काळ जी घेणे ही माझी प्राथमिकता आणि जवाबदारी आहे" असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. श्रीगणेश बर्नेला यांनी यावेळी नमूद केले.
तज्ञांनी अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
500 हून अधिक उपस्थितांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
गौरव सोहळा:... जीव वाचवणाऱ्या दात्यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
रुग्ण आणि दात्यांमधील दरी कमी करण्यासाठी आणि अवयवदानाची नोंदणी वाढवण्यासाठी सर्वांनी सामूहिक संकल्प करून या कार्यक्रमाची
सांगता झाली.
What's Your Reaction?