नगरसेवकांच्या नातेवाइकांना महापालिकेच्या कार्यालयात हस्तक्षेप करण्यास बंदी, आयुक्तांच्या स्पष्ट आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ...!
महापालिका कार्यालयांमध्ये नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपास बंदी; आयुक्तांचे स्पष्ट आदेश...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालय, विभागीय कार्यालये तसेच विविध विकासकामांच्या ठिकाणी नगरसेवक व नगरसेविकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कडक निर्देश जारी केले आहेत. यापुढे नगरसेवकांच्या नातेवाईकांना प्रशासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास परवानगी नसणार आहे.
आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महानगरपालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याचा व प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मत मांडण्याचा अधिकार केवळ लोकांनी निवडून दिलेल्या अधिकृत नगरसेवक किंवा नगरसेविकांनाच आहे. मात्र काही ठिकाणी त्यांचे पती, पत्नी, वडील, मुले, भाऊ, दिर तसेच इतर नातेवाईक कार्यालयात वावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय काही व्यक्ती स्वतःला नगरसेवक असल्याचे भासवून सोशल मीडियावर उल्लेख करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना नगरसेवक म्हणून फोन करणे, कार्यालयांमध्ये नगरसेवकांच्या अधिकारात भेटी देण्याचा प्रयत्न करणे किंवा खासगी कार्यालयांवर नगरसेवक म्हणून उल्लेख करणे अशा प्रकारांनाही आता प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा कृत्यांना महानगरपालिकेची बदनामी करणारे व कारवाईस पात्र असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगरसेवकांना योग्य तो मान देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या सूचनांवर किंवा दबावाखाली कोणतेही काम करू नये, तसेच नियमबाह्य कामे अजिबात करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक म्हणून आलेल्या व्यक्तींची कामे मात्र नियमानुसार करण्यात यावीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि प्रशासनावर अनावश्यक दबाव रोखण्यासाठी हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
What's Your Reaction?