नळाचे पाणी रस्त्यावर आढळले तर भरावा लागेल हजारोंचा दंड, पाण्याचा अपव्यय टाळा...

 0
नळाचे पाणी रस्त्यावर आढळले तर भरावा लागेल हजारोंचा दंड, पाण्याचा अपव्यय टाळा...

पाणी बचतीसाठी मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन...

नळाला तोटी बसवा पाण्याचा अपव्यय टाळा...15 ऑक्टोबर पर्यंतगळतीची कामे तातडीने पूर्ण करा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.4(डि-24 न्यूज)-यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी शहरातील सर्व नागरिकांना पाणी बचत करण्याचे तसेच पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

पाणी भरल्यानंतर नागरिकांनी तात्काळ नळ बंद करावा, तसेच पाणी रस्त्यावर, नालीमध्ये अथवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक नागरिकाने आपल्या नळांना योग्य तोटी बसवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या आणि अंतर्गत जल वाहिनीतील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पाण्याची गळती अथवा अपव्यय आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक 5 हजार ते 25 हजार रुपया पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.यात प्रथम वेळी 500/- द्वितीय वेळी 10000/- व तृतीय वेळी 25000/- व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

ज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत आहे, अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार अथवा पंपाचा वापर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत नळ जोडणी तातडीने अधिकृत करून घ्यावी आणि महानगरपालिकेच्या जलवाहिनीत परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यावर वाहने धुणे, घरासमोरील रस्ता धुणे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करू नये. नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

“पाणी ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेस सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow