पंतप्रधान आवास योजनेच्या नवीन अर्जासाठी मुदतवाढ, राष्ट्रीयकृत बँका देणार गृहकर्ज

 0
पंतप्रधान आवास योजनेच्या नवीन अर्जासाठी मुदतवाढ, राष्ट्रीयकृत बँका देणार गृहकर्ज

पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्ज देण्यास सहमती; अर्जदारांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 7 (डि-24 न्यूज) - महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांसाठी नवीन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी 6 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. आता इच्छुक नागरिकांना 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

शहरातील सुंदरवाडी आणि हर्सूल येथील सदनिकांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. मात्र पडेगाव येथील गट क्रमांक 69, तसेच तिसगाव येथील गट क्रमांक 225/1 आणि 227/1 मधील काही सदनिका अद्याप शिल्लक आहेत. या सदनिकांसाठी नवीन अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्जाची सुविधा

खासगी बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर तुलनेने अधिक असल्याने अनेक गरजू व इच्छुक अर्जदारांकडून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, राष्ट्रीयकृत बँका आणि संबंधित ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांनी लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्ज मंजूर झाल्यानंतर एका वर्षानंतर व्याज आकारणी सुरू होईल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून तुलनेने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांचा मासिक हप्ता कमी होण्यास मदत होणार आहे.

अर्जासाठी केवळ 708 रुपये शुल्क

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना पात्र नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. नवीन अर्ज करण्यासाठी केवळ 708 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. लकी ड्रॉसाठी स्वतंत्रपणे पाच हजार रुपये भरण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

लकी ड्रॉमध्ये घर मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घराच्या मूळ किमतीतून अडीच लाख रुपयांची रक्कम वजा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज भरताना पुढील कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे—

ओटीपीसाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक

ई-मेल आयडी

विवाहित अर्जदारांसाठी पती-पत्नीचे आधार कार्ड व पॅन कार्ड

तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

बँक पासबुक

विधवा अर्जदारांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

येथे मिळणार अर्जासाठी मार्गदर्शन

लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी लाभार्थी सेवा केंद्र, कला दालन, टाऊन हॉल, महापालिका, तसेच गट क्रमांक 225/1 व 227/1, सोलापूर-धुळे महामार्गालगत, बुद्ध विहारासमोर आणि पडेगाव येथील गट क्रमांक 69, पॉवर हाऊसच्या बाजूला येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज व योजनेबाबत अधिक माहितीसाठी 9730108515 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही अर्ज करता येणार

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी इच्छुक नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ

15 ऑगस्ट ही अंतिम मुदत असल्याने पात्र व इच्छुक नागरिकांनी मुदतीपूर्वी अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow