पत्नी पिडीत संघटनेचे अनोखे आंदोलन, पत्नी पिडीत पुरुषांची न्यायासाठी पिंपळ पौर्णिमा साजरी...!
वटसावित्रीपूर्वी ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी; पत्नी पीडित पुरुषांनी न्यायासाठी मांडली व्यथा...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)-
वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नी पीडित पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शनिवारी सकाळी ‘पिंपळ पौर्णिमा’ हा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे पूजन करून उलट्या 108 प्रदक्षिणा घालत आपल्या वैवाहिक जीवनातील वेदना आणि न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. मात्र अनेक पुरुषांना विवाहानंतर मानसिक छळ, खोटे गुन्हे, न्यायालयीन लढाया, आर्थिक शोषण, सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक विघटनाचा सामना करावा लागत असल्याचा दावा संघटनेने केला.
पत्नी पीडित पुरुष आश्रम गेल्या सात वर्षांपासून ‘पिंपळ पौर्णिमा’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबवत आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, वटसावित्रीच्या एक दिवस आधी हा उपक्रम आयोजित करून पिंपळ वृक्षासमोर प्रार्थना केली जाते. या माध्यमातून वैवाहिक जीवनातील अन्याय, मानसिक वेदना आणि पुरुषांच्या समस्यांकडे शासन व समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी वैवाहिक आयुष्यातील मानसिक, आर्थिक आणि कायदेशीर त्रासांचे अनुभव कथन केले. काहींना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्यात आल्याचा, तर काहींना कुटुंबापासून दूर राहावे लागल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारच्या वैवाहिक यातना पुन्हा कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पुरुषांच्या वाढत्या मानसिक, सामाजिक व आर्थिक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. कौटुंबिक वादांतील पुरुषांच्या आत्महत्यांकडे गंभीरतेने पाहणे, खोट्या तक्रारी सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे, प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करणे, स्वतंत्र पुरुष आयोगाची स्थापना करणे तसेच कौटुंबिक प्रकरणांचा वेळेत निकाल लावण्याची मागणीही करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष ॲड. भारत फुलारे यांनी सांगितले की, हा संघर्ष कोणत्याही महिलाविरोधात नसून महिला व पुरुष दोघांनाही समान न्याय मिळावा, हीच संघटनेची भूमिका आहे. पुरुषांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहावी आणि न्यायव्यवस्थेत संतुलित दृष्टिकोन स्वीकारला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास अध्यक्ष ॲड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुरिसिंगे, सोमनाथ मनाळे, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साकडे, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, धवळे, दिनेश भाऊ दूधाट, उमेश दूधाट यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्नी पीडित पुरुष मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.
What's Your Reaction?