मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 0
मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

विधान परिषद निवडणूक, पदवीधर मतदार संघ 2026

                                                                                                   मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 29 (डि-24 न्यूज) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी व संबंधित यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे आणि वेळेत पार पाडावी. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळूंके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सविता चौधर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम...

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. दि. 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, दि. 7 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. दि. 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. दि. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, दि. 31 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू आहे.

मतदान केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा...

जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राची तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधांची खातरजमा करावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज तसेच अन्य आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करावी. त्रुटी असल्यास त्या मतदानापूर्वी दूर कराव्यात. मतदान केंद्रांचे नियोजन करताना शक्यतो एका केंद्रावर 800 ते 850 मतदार राहतील, यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत तहसीलदारांनी जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची संख्या, छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांचे नियोजन व तेथील सुविधांबाबत माहिती सादर केली. मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी मतदान केंद्रनिहाय पूर्वतयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आवश्यक बाबींमध्ये निवडणूक आयोगाची परवानगी अपेक्षित असल्यास संबंधित प्रस्ताव विहित कार्यपद्धतीनुसार वेळेत सादर करावेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपापल्या जबाबदारीतील कामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढाव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow