मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे - इम्तियाज जलिल

 0
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे - इम्तियाज जलिल

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे : इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 16 (डि-24 न्यूज) : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मराठवाड्याच्या पाण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच पाण्याची तूट दूर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठवाडा समान पाणी वाटप संघर्ष समितीच्या तीन दिवसीय धरणे आंदोलनाला भेट देऊन इम्तियाज जलील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मराठवाड्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. मागील वर्षी १ हजार ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर जानेवारी २०२६ ते जून २०२६ या कालावधीत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा जलील यांनी केला. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असल्याचे सांगते; मात्र मराठवाड्याचा पाण्याचा अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई केली जाते, कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, दुसरीकडे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची सरकारने दखल घेणे आवश्यक आहे, असे जलील म्हणाले.

पाण्याचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा प्रश्न नसून संपूर्ण मराठवाड्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आमदार प्रा. रमेश बोरनारे हे पाण्याच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करीत आहेत. त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र आणून मोठे आंदोलन उभे करावे, आम्ही त्यांना साथ देऊ, असेही जलील यांनी सांगितले.

सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार मराठवाड्यात सुमारे २६० टीएमसी पाण्याची तूट असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी अडवून ते मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आमदार रमेश बोरनारे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.

यावेळी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, प्रा. सुशीला मोराळे, माजी आमदार विजय गव्हाणे, सुभाष लोमटे, प्रकाश आहेर, अशोकराव दाबके, हट्टेसिंग चौधरी, जनार्दन तुपे, सुभेदार मेजर सुखदेव बन यांच्यासह आंदोलनकर्ते व नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या प्रश्नासाठी सुरू असलेल्या आपल्या आंदोलनाचाही जलील यांनी यावेळी उल्लेख केला. ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळेपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow