मराठवाड्यात एटीएसची कार्यवाई, 14 जणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात...!

 0
मराठवाड्यात एटीएसची कार्यवाई,  14 जणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात...!

एटीएसची मराठवाड्यात मोठी कारवाई : संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिवमध्ये छापे; संशयित सोशल मीडिया संपर्क प्रकरणी 14 जणांना ताब्यात घेऊन चौकशी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), जालना, बीड व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करत एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. संशयित सोशल मीडिया संपर्कांशी संबंधित प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 14 संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमधील 6 जणांसह एकूण 14 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संशयास्पद संपर्क आणि हालचालींबाबत एटीएसला माहिती मिळाली होती. त्याआधारे तिन्ही जिल्ह्यांत समन्वित कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणा ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या सोशल मीडिया खात्यांची, संपर्कांची आणि त्यांच्या हालचालींची सखोल चौकशी करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही कारवाई केवळ तपासाच्या उद्देशाने करण्यात आली असून, अद्याप कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. संशयित संपर्कांचे स्वरूप नेमके काय होते आणि त्यामागे कोणते संघटित जाळे किंवा अन्य कोणतीही बेकायदेशीर कारवाई होती का, याचा शोध एटीएस घेत आहे.

तपास यंत्रणा डिजिटल पुरावे, मोबाईल फोन, सोशल मीडिया चॅट तसेच इतर तांत्रिक बाबींचीही तपासणी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएसच्या या कारवाईनंतर मराठवाडा परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अर्धवट माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर एटीएसकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow