"माझा कर, माझी जवाबदारी" मोहिमेला प्रतिसाद, झोन 8 व झोन 10 मध्ये 1032 नवीन मालमत्तांना कर आकारणी...

 0
"माझा कर, माझी जवाबदारी" मोहिमेला प्रतिसाद, झोन 8 व झोन 10 मध्ये 1032 नवीन मालमत्तांना कर आकारणी...

‘ माझा कर, माझी जबाबदारी’ मोहिमेला प्रतिसाद; झोन 8 व झोन 10 मध्ये अवघ्या तीन दिवसांत 1032 नवीन मालमत्तांना कर आकारणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23 (डि-24 न्यूज)- शहरातील ज्या मालमत्तांना अद्याप मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली नाही, अशा मालमत्तांना करजाळ्यात आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे ‘माझा कर, माझी जबाबदारी’ ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत सातारा-देवळाई (झोन 8) आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी (झोन 10) परिसरात विशेष कर आकारणी मोहीम राबविण्यात आली. अवघ्या तीन दिवसांत 1032 नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात यश मिळाले आहे.

 महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये तसेच मा. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्या सूचनेनुसार आणि मा. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील करजाळ्याबाहेर असलेल्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून 20 मे ते 22 मे या कालावधीत झोन क्रमांक 8 आणि झोन क्रमांक 10 मध्ये विशेष कर आकारणी मोहीम हाती घेण्यात आली. या तीन दिवसांच्या कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नव्या मालमत्तांची तपासणी, नोंदणी आणि कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये केवळ तीन दिवसांत 1,032 नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली, ही या मोहिमेची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

महानगरपालिकेच्या ‘माझा कर, माझी जबाबदारी’ या व्यापक मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 3000 हून अधिक मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली असून, त्यामुळे शहराच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच करजाळ्याबाहेर असलेल्या मालमत्तांची अचूक नोंदणी होऊन मालमत्ता कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

या विशेष मोहिमेत झोन क्रमांक 8 मधील तांत्रिक कर्मचारी कुणाल भोसले यांच्या सह प्राप्ती जाधव, कृष्णा ठोकळ, गणेश वीर यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम पाहिले. तर झोन क्रमांक 10 मध्ये मुकेश खडसे, संतोष वाचासुंदर, शिवम घोडके आणि आसिफ शेख यांनी कर आकारणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

या मोहिमेचे नियोजन झोन 8 चे सहायक आयुक्त भरत बिरारे तसेच झोन 10 च्या सहायक आयुक्त अर्चना राजपूत यांनी केले.

महानगरपालिकेकडून ही विशेष मोहीम पुढील आठवड्यातही सुरू ठेवण्यात येणार असून, शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी स्वतःहून मालमत्ता कर आकारणी करून घ्यावी आणि मालमत्ता करात उपलब्ध असलेल्या 10 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow