कर वसूलीत सुसूत्रता, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कर वसुली कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...
कर वसुलीत सुसूत्रता, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कर वसुली कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कर वसुली प्रक्रियेत अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने आज महानगरपालिकेच्या सर्व झोनमधील कर वसुली कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘श्रीमित्रा’ अॅपच्या प्रभावी वापरातून जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहोचून कर वसुली वाढविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अमोल येडगे यांनी उपस्थित सर्व कर वसुली कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कर वसुली ही केवळ महसूल वाढीची प्रक्रिया नसून नागरिकांशी विश्वासपूर्ण संवाद साधत प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कर वसुली अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कार्यशाळेदरम्यान ‘श्रीमित्रा’ अॅपवर दररोजच्या कामाचे रिपोर्टिंग कसे करावे, मालमत्ता धारकांची माहिती अद्ययावत करण्याची पद्धत, कर वसुली करताना कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे, तसेच नागरिकांशी संवाद साधताना कोणती भूमिका ठेवावी याबाबत कर वसुली कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. कर वसुली प्रक्रियेत केवळ आर्थिक बाबींवर भर न देता नागरिकांशी सौहार्दपूर्ण, सकारात्मक आणि परिणामकारक संवाद साधण्याच्या सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावरही विशेष भर देण्यात आला.
तसेच, सर्व झोन अधिकाऱ्यांना कर वसुली कर्मचाऱ्यांचे मॉनिटरिंग अधिक प्रभावीपणे कसे करावे, त्यांच्या दैनंदिन रिपोर्टिंगची पडताळणी कशी करावी आणि जास्तीत जास्त कर वसुलीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न कसे करावेत याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
महानगरपालिकेकडून सध्या ‘श्रीमित्रा’ अॅपच्या माध्यमातून कर वसुली कर्मचाऱ्यांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग केले जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. याचाच प्रत्यय म्हणून मे महिन्यात कर वसुली कर्मचाऱ्यांनी तब्बल 12 हजार थकीत मालमत्तांना प्रत्यक्ष भेटी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे थकबाकीदारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
कर वसुली कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करून अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या तसेच जास्तीत जास्त थकीत मालमत्तांना भेटी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला “Employee of the Month” पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांनी केली. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून कर वसुलीत आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तांत्रिक क्षमता, जबाबदारीची जाणीव, प्रभावी संवादकौशल्य आणि नियमित मॉनिटरिंग यांच्या समन्वयातून कर वसुली प्रक्रिया अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी सर्व कर वसुली कर्मचारी, कर अधीक्षक, झोन अधिकारी, उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.
What's Your Reaction?