मुख्य नाल्यावरील बांधकामांना वाढीव कर, नाल्यात थेट ड्रेनेज सोडणा-या विरोधात विशेष मोहीम - आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश...
मुख्य नाल्यांवरील बांधकामांना वाढीव कर; नाल्यात थेट ड्रेनेज सोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम — आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- शहरातील मुख्य नाल्यांवर परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या इमारतींमुळे नालेसफाईच्या कामात मोठे अडथळे निर्माण होत असून यामुळे शहरातील पावसाळी व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत असल्याची दखल घेत, अशा इमारतींना वाढीव कर आकारण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील नाल्यांमध्ये थेट ड्रेनेज सोडणाऱ्या नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
आज दिनांक 22 मे रोजी आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी शहरातील प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नालेसफाई कामाचा आढावा घेतला. कबाडीपुरा येथून या पाहणीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बारूदगर नाला, संभाजीपेठ तसेच रोपळेकर चौक परिसरातील मुख्य नाल्यांची पाहणी करून तेथील साफसफाई, अतिक्रमण आणि पाणी निचरा व्यवस्थेची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, संबंधित इमारतींना परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र अशा बांधकामांमुळे नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. नाल्यांवर बांधलेल्या इमारतींच्या खालच्या भागात कचरा साचून राहतो, त्यामुळे नालेसफाई पूर्ण क्षमतेने करता येत नाही. परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळला जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर नाल्यांवर परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या इमारतींना वाढीव कर आकारण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
यावेळी शहरातील काही भागांत घरगुती व व्यावसायिक ड्रेनेज लाईन थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आल्याचे प्रकारही समोर आले. या प्रकारामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी मिसळून ते सतत दूषित राहतात, दुर्गंधी पसरते आणि नाल्यांची नैसर्गिक वहनक्षमता कमी होते. विशेषतः अतिवृष्टीच्या काळात नाल्यांमध्ये अतिरिक्त पाणी साचून ते ओसंडून वाहण्याचा धोका निर्माण होतो. याचा फटका नाल्याकाठच्या नागरिकांसह शहरातील इतर भागांनाही बसतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधित नागरिकांना नोटिसा बजावून त्यांचे ड्रेनेज एसटीपीशी (सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा) जोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त श्री. येडगे यांनी सांगितले की, शहरातील नाले केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आहेत. त्यामध्ये थेट सांडपाणी सोडल्यास नाल्यांची क्षमता कमी होते आणि पर्यावरणीय तसेच सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे.
पाहणीदरम्यान कबाडीपुरा येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रालाही आयुक्तांनी भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. तसेच रोपळेकर चौक परिसरात पाण्याची पाईपलाईन जमिनीवर आल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित ठेकेदा
राशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली आणि ती पाईपलाईन तातडीने जमिनीखाली टाकण्याचे निर्देश दिले.
शहरातील पावसाळी पूर्वतयारी, नालेसफाई, अतिक्रमण नियंत्रण आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कामांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
या पाहणीदरम्यान शहर अभियंता संजय कोंबडे, वॉर्ड अभियंता काझी जावेद, किरण तमनर, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?