राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार - महिला व बालविकास मंत्री अदीती तटकरे

महिला व बाल विकास विभाग
‘बालस्नेही पुरस्कार 2024’ चे वितरण
राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.3(डि-24 न्यूज): बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘बालस्नेही पुरस्कार 2024’ समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदिसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह
आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या की, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.
यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, आयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.
बालकाच्या जन्मापासून ते 18 वर्ष होईपर्यंत शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, उत्कृष्ट विशेषगृह, उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व, सहायक पोलीस आयुक्त, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस उपनिरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट बाल कल्याण समिती, पोलीस हवालदार, उत्कृष्ट बालगृह, पोलीस शिपाई, बालस्नेही पुरस्कार, पोलीस अंमलदार, उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी, उत्कृष्ट खुले निवारा गृह, उत्कृष्ट काळजी वाहक, उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
What's Your Reaction?






