वंचित बहुजन आघाडीने केले शहर बंद... बंदला संमिश्र प्रतिसाद, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात...!
वंचित बहुजन आघाडीने केले शहर बंद, बंदला संमिश्र...शहर पोलिसांची धावपळ, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून सोडले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23 (डि-24 न्यूज) – दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शहर बंदला छत्रपती संभाजीनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पैठण गेट व क्रांतीचौक येथे कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता. दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असता पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. क्रांतीचौक व सिटी चौक पोलिस ठाण्यात आणून कार्यकर्त्यांवर कारवाई करुन सोडले. याप्रसंगी शाब्दिक चकमक झाली. सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
शहरातील काही भागांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला, तर दुपारनंतर बहुतांश ठिकाणी जनजीवन पूर्ववत झाले.
शहर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील, क्रांतीचौक, सिटी चौक, गुलमंडी, सराफा, शहागंज, पैठण गेट, नूतन कॉलनी, टिळक पथ, टीवी सेंटर, मुकुंदवाडी आणि रामनगर, हडको काॅर्नर, एकता नगर, क्रांती नगर, हर्सुल, भडकलगेट, बेगमपुरा परिसरात व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. मात्र दुपारनंतर बहुतांश बाजारपेठांमध्ये दुकाने सुरू झाल्याने व्यापार पुन्हा सुरळीत झाला.
काही भागांमध्ये रिक्षाचालकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याने दुपारपर्यंत रिक्षा वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था आणि इतर शासकीय कार्यालयांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असल्याने शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला नाही.
बंद यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अमित भुईगल, नगरसेवक अफसर खान, करुणा मेघानंद जाधव, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी, प्रदेश प्रवक्ते तैय्यब जफर, पूर्वचे शहराध्यक्ष मतीन पटेल, राजन कीर्तने, सूरज मूळे पाटील, प्रवीण हिवाळे, संदीप जाधव, उमेश सरदार, भगवान खिल्लारे, आनंद शेजुळ, इकबाल शेख, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अकरम पटेल यांच्यासह विविध प्रभागांतील कार्यकर्त्यांनी शहरभर जनजागृती मोहीम राबविली.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, रवि तायडे आणि सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान बंदच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पैठण गेट परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर ॲड. पंकज बनसोडे, राहुल मकासरे, बंडू कांबळे, नाना म्हस्के, रेखा उदगिरे आणि दादाराव लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला.
शहर बंददरम्यान हर्सूल टी-पॉइंट येथे वंचित बहुजन मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मिलिंद बोर्डे, आनंद शेजुळ, दामोदर दाभाडे, प्रकाश दाभाडे, जॉन भाई, कपिल गायकवाड, अमोल खंडागळे, प्रमोद नवगिरे आणि अशोक गवळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
शहर बंदला काही भागांत चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी दुपारनंतर बहुतांश बाजारपेठा आणि व्यापारी आस्थापने सुरू झाल्याने बंदचा प्रभाव मर्यादित राहिल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
सायंकाळी शहरात सर्व व्यवहार सु
रळीत झाले.
What's Your Reaction?