शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकशास्त्र व सकारात्मक प्रसाराची गरज - महापौर समीर राजूरकर
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकशास्त्र व सकारात्मक प्रसाराची गरज – महापौर समीर राजूरकर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- शहराचा विकास केवळ चांगले रस्ते, उंच इमारती किंवा भौतिक सुविधांमुळे होत नाही, तर शहरातील नागरिकांचे नागरिकशास्त्र, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि शहराविषयीची आपुलकीही तितकीच महत्त्वाची असते. छत्रपती संभाजीनगरला विकसित आणि जागतिक स्तरावर सकारात्मक ओळख मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवरील कंटेंट क्रिएटर्स यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी केले.
महापौर समीर राजूरकर यांच्या संकल्पनेतून 'कॉफी विथ मेयर' या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन आज स्मार्ट सिटी कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील सुमारे 100 सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स, ट्रॅव्हल ब्लॉगर्स, कॉमेडी क्रिएटर्स आणि विविध डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी महापौर राजूरकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहराचा आत्मा हा त्याच्या समृद्ध पर्यटन वारशात आहे. शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांची सकारात्मक माहिती देश-विदेशापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे समाजमाध्यमे आहेत. त्यामुळे शहराची चांगली, विश्वासार्ह आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत.
कार्यक्रमादरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना, नागरिकांचा सहभाग, स्वच्छता, वाहतूक शिस्त, पर्यटन विकास, सांस्कृतिक जतन आणि डिजिटल माध्यमांची भूमिका यासह विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी कंटेंट क्रिएटर्स व ब्लॉगर्स यांनी मांडलेल्या सूचना आणि अपेक्षा महापौरांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.
शहराला अधिक सुंदर, विकसित आणि जगासमोर सकारात्मक प्रतिमेसह उभे करण्यासाठी नागरिक, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवरील कंटेंट क्रिएटर्स यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी यावेळी केले.
What's Your Reaction?