शहरातील प्रसिद्ध उत्तम मिठाई उपहारगृहावर एफडीएची कार्यवाई, परवाना निलंबित केल्याने खळबळ...!
शहरातील प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना निलंबित; पुनर्वापर केलेले तेल, झुरळे व अस्वच्छतेमुळे एफडीएची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23 (डि-24 न्यूज) – शहरातील इमरती व जलेबीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमंडी परिसरातील मच्छीखडक येथील प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह' विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत उपहारगृहाचा खाद्य परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार वापरलेले तेल, स्वयंपाकघरात झुरळांचा वावर, आरोग्यास अपायकारक रंगांचा वापर आणि गंभीर अस्वच्छता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
एफडीएला उपहारगृहातील अनियमिततेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहआयुक्त श्रीकांत करकले आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. झाडे आणि त्यांच्या पथकाने बुधवारी उपहारगृहावर अचानक छापा टाकला.
तपासणीदरम्यान उपहारगृहाने खाद्यपदार्थ उत्पादक म्हणून आवश्यक असलेला परवाना न घेता, रेस्टॉरंटसाठीचा वेगळ्या प्रकारचा परवाना घेतल्याचे निदर्शनास आले. याशिवाय समोसे, भजे आणि इतर तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी कापूस बियांच्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केला जात असल्याचे आढळले. विशेष यंत्राद्वारे तपासणी केली असता तेलाची टीपीएम (Total Polar Material) / बीआर रीडिंग मानकांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले.
इतकेच नव्हे तर इमरती, जलेबी आणि इतर मिठाई तयार करतानाही वनस्पती तेलाचा अनेक वेळा पुनर्वापर केला जात असल्याचे उघड झाले. या मिठाईंमध्ये आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या कृत्रिम खाद्य रंगांचाही वापर करण्यात येत असल्याचे तपासणीत समोर आले.
स्वयंपाकघर आणि खाद्यपदार्थ तयार करण्याच्या विभागात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळली. अन्न तयार करण्याच्या जागेत झुरळांचा मुक्त संचार होता. कचरापेट्यांना झाकणे नव्हते, खिडक्यांवर कीटकप्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच भिंतींवर तंबाखू थुंकल्याच्या खुणा दिसून आल्या. संपूर्ण स्वयंपाकघर आणि खाद्यनिर्मिती विभागात स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे एफडीएच्या पथकाने नोंदविले.
या सर्व गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने 'उत्तम उपहारगृह'चा खाद्य व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करत उपहारगृह बंद करण्याचे आदेश दिले. संबंधितांनी सर्व त्रुटी दूर करून अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एफडीएने शहरातील सर्व खाद्य व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दि
ला आहे.
What's Your Reaction?