गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून पाहणी...
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी...
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत केबल, वीजवाहिन्या व बांधकाम साहित्य हटविण्याच्या सूचना...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- येत्या 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आज गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह महानगरपालिका, पोलीस प्रशासन व महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संस्थान गणपती मंदिर, राजाबाजार येथून शहागंज, सिटी चौक, गुलमंडी मार्गे संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहिरीपर्यंतच्या मुख्य मिरवणूक मार्गाची पायी पाहणी केली. मिरवणूक सुरळीत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना करण्यात आल्या.
मिरवणूक मार्गावरील सर्व अनधिकृत केबल तातडीने काढून टाकाव्यात, महावितरणच्या वीजवाहिन्यांची आवश्यकतेनुसार उंची वाढवावी, तसेच मार्गावर पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पडून असलेला बांधकाम मलबा, पाइप व इतर साहित्य तातडीने हटवावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच मार्गावरील उघडी असलेली पाण्याची व्हॉल्व झाकून ठेवावीत आणि मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
विसर्जन विहिरींची पाहणी...
यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहीर, क्रीडा संकुल परिसरातील विसर्जन विहीर तसेच शिवाजीनगर येथील विसर्जन विहिरींची पाहणी केली. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच आवश्यक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
क्रीडा संकुलातील विसर्जन विहिरीचा वापर करण्याचे आवाहन...
गारखेडा परिसरातील क्रीडा संकुल येथे यंदा प्रथमच गणेश विसर्जनासाठी विसर्जन विहीर सज्ज करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रीडा संकुल परिसरातील विसर्जन विहिरीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर, पदाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी केले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
What's Your Reaction?