शहरातील हाॅकर्स व किरकोळ परवानाधारकांना राॅकेलचा पुरवठा करण्याची मागणी...!.

 0
शहरातील हाॅकर्स व किरकोळ परवानाधारकांना राॅकेलचा पुरवठा करण्याची मागणी...!.

गोरगरीब हॉकर्स व रिटेलर्सना रॉकेल पुरवठा सुरू करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : केंद्र व राज्य शासनाने पुन्हा रॉकेल वाटप सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही शहरातील गोरगरीब हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवाना धारकांना अद्याप रॉकेलचा मालपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधितांना तात्काळ रॉकेल पुरवठा करून प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी द ऑल महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स अँड रिटेलर्स फेडरेशनतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फेडरेशनचे अध्यक्ष अहमद खान रशीद खान बंदानवाजी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक गोरगरीब हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवाना धारक गेल्या 40 ते 50 वर्षांपासून रॉकेल विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, सन 2018 पासून शासनाच्या धोरणामुळे रॉकेल पुरवठा बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, अलीकडील काळात घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर इंधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने जिल्हास्तरावर पुन्हा रॉकेल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, शहरातील रॉकेल परवाना धारकांना अद्याप मालपुरवठा सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध व्हावे तसेच हॉकर्स व परवाना धारकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी तात्काळ रॉकेलचा पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनासोबत शासन व पुरवठा विभागाशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती तसेच शहरातील हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवानाधारकांची यादी जोडण्यात आली आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow