संत तुकाराम वस्तीगृह व बार्टी बांधकाम निविदेची स्वतंत्र चौकशी करण्याची अंबादास दानवेंची मागणी
संत तुकाराम वसतिगृह व बार्टी बांधकाम निविदेची स्वतंत्र चौकशी करा...
शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी...
मुंबई / छत्रपती संभाजीनगर (डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभागांतर्गत उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम मुलांचे व मुलींचे वसतिगृह, प्रशासकीय इमारत तसेच बार्टी संस्थेच्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या बांधकामासाठी राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, पात्रता अटींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते, आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
निविदेमध्ये उच्च मूल्याच्या तांत्रिक पात्रता अटींचा समावेश असूनही त्यांची प्रत्यक्ष पडताळणी न करता प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. विशेषतः 60 घनमीटर क्षमतेचा RMC प्लांट, किमान आठ ट्रान्झिट मिक्सर्स, 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या ग्रीन बिल्डिंग प्रकल्पांचा अनुभव तसेच संबंधित IGBC, GRIHA किंवा LEED प्रमाणपत्रांची सत्यता स्वतंत्रपणे तपासण्याची आवश्यकता असल्याचे दानवे म्हंटले.
याशिवाय तांत्रिक मूल्यांकन समितीने कोणत्या कागदपत्रांच्या आधारे निविदादारांना तांत्रिकदृष्ट्या पात्र घोषित केले, याचीही चौकशी करण्यात यावी. RMC प्लांट, ट्रान्झिट मिक्सर्स, वर्क ऑर्डर, करार, पूर्णत्व प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, तांत्रिक मूल्यांकन अहवाल, स्क्रुटिनी शीट, इव्हॅल्युएशन शीट आणि संबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्याची मागणीही अंबादास दानवेंनी केली.
पात्रता अटींची संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ पडताळणी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया अथवा कंत्राट मंजुरीची कार्यवाही स्थगित ठेवावी, तसेच नियमबाह्य पद्धतीने कोणालाही पात्र ठरविण्यात आले असल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
What's Your Reaction?