सिडकोत भरदिवसा तरुणाचा खून, पोलिस घटनास्थळी दाखल, आरोपींचा शोध सुरू
छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोत भरदिवसा तरुणाचा खून; बंटी दीक्षित यांची हत्या, आरोपी फरार
आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22 (डि-24 न्यूज) : शहरातील सिडको परिसरात बळीराम पाटील हायस्कूलजवळील मंगेश गॅस एजन्सी परिसरात एका तरुणाची भरदिवसा हत्या झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. बंटी दीक्षित असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला संबंधित तरुणाचा अपघात घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच एन-७ सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत बंटी दीक्षित यांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याची माहिती आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एन-7 सिडको पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?