"स्कूल ठीक करो"अभियानाला यश, सरकारी शाळांच्या दुरुस्तीचे तातडीने निघाले आदेश...!
‘स्कूल ठीक करो’ अभियानाला मोठे यश!
राज्यातील सरकारी शाळांच्या दुरुस्तीचे तातडीचे आदेश;
वीज, पाणी, शौचालयांसह वर्गखोल्यांची होणार डागडुजी
मुंबई, दि.18(डि-24 न्यूज)- राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभियानाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील जर्जर सरकारी शाळांमध्ये आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामीण विकास विभागाच्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील 63 हजार 836 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 40 हजार 530 शाळांमध्ये मुलींच्या शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे समोर आले. काही शाळांमध्ये शौचालयांची सुविधाच उपलब्ध नसल्याची बाबही निदर्शनास आली.
वीज-पाणी-शौचालयांसह वर्गखोल्यांची दुरुस्ती
शाळांमध्ये आवश्यक असलेल्या वीज, पाणी, शौचालय, वर्गखोल्या, ब्लॅकबोर्ड तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे करण्यात येणार असून, शाळांना सुट्टी असताना कामांना गती देण्याचे नियोजन आहे. विशेषतः गणपती आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनादरम्यान अडथळ्यांचा सामना
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी विविध शाळांमधील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांना शाळा परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. राजस्थानमधील जयपूर येथे अभियानातील कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि मारहाणीची घटना घडल्याचेही सांगण्यात आले.
मात्र, अडचणी आणि विरोधाला न जुमानता शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न सातत्याने मांडण्यात आल्याने अखेर शासनाने दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे अभियानाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
आता ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियान
‘स्कूल ठीक करो’ अभियानानंतर अभिजीत दीपके यांनी आता ‘फिक्स ट्राइबल स्कूल्स’ अर्थात ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या नव्या राष्ट्रीय अभियानाची घोषणा केली आहे. आदिवासी भागातील शाळांमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या नव्या अभियानाची सुरुवात गडचिरोली येथून करण्यात आली असून, आशुतोष रांका हे गुजरातमधून या मोहिमेला सुरुवात करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि मूलभूत सुविधांनी युक्त शैक्षणिक वातावरण मिळणे हा केवळ विकासाचा मुद्दा नसून त्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने दिलेले आदेश प्रत्यक्षात कितपत आणि किती वेगाने अंमलात येतात, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?