स्मार्ट सिटी बसच्या सुरक्षेसाठी 15 दिवसांचा सेफ्टी ड्राईव्ह, आयुक्तांचे निर्देश

 0
स्मार्ट सिटी बसच्या सुरक्षेसाठी 15 दिवसांचा सेफ्टी ड्राईव्ह, आयुक्तांचे निर्देश

स्मार्ट सिटी बसच्या सुरक्षेसाठी 15 दिवसांचे सेफ्टी ड्राईव्ह

आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश; प्रत्येक बसची चेकलिस्टनुसार तपासणी बंधनकारक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - शहरातील स्मार्ट सिटी बससेवेतील प्रवाशांची सुरक्षितता तसेच बसची तांत्रिक स्थिती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज जाधवमंडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन बसची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन बस सुरक्षेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

मागील दोन आठवड्यांत रेल्वे स्टेशन परिसरात एका स्मार्ट बसच्या वायरिंगला आग लागून धूर निघण्याची घटना तसेच खुलताबाद घाट परिसरात एका बसचे टायर निखळण्याची घटना घडली होती. या घटनांची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी बसच्या तांत्रिक व यांत्रिक सुरक्षेची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आयुक्तांनी 15 दिवसांचे विशेष ‘सेफ्टी ड्राईव्ह’ राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक बस मार्गावर सोडण्यापूर्वी तिची निर्धारित चेकलिस्टनुसार तपासणी करण्यात यावी. बसचे ग्रीसिंग, नट-बोल्ट, टायरची स्थिती, टायरमधील हवेचा दाब तसेच इतर महत्त्वाचे यांत्रिक घटक तपासल्यानंतरच बस मार्गावर सोडण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बसच्या बॅटरी व वायरिंगची जोडणी, लूज कनेक्शन अथवा अन्य तांत्रिक त्रुटी आहेत का, याची डेपो स्तरावर नियमित तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. टायर निखळणे किंवा बसला आग लागणे या घटना प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या असून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सेफ्टी नॉर्म्सची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी सांगितले.

बस मार्गावर घेऊन जाण्यापूर्वी सर्व सुरक्षा बाबींची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित चालकाचीही आहे. चेकलिस्टमधील सर्व बाबींची खात्री केल्याशिवाय चालकाने बस डेपोतून बाहेर काढू नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

ई-बसेसच्या चाचण्या 17 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश* 

इलेक्ट्रिक बस ताफ्यातील 34 बसेसची तांत्रिक चाचणी व्यवस्थित करण्यात यावी. बस चार्ज करून त्याची चाचणी घेण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी लक्षात घेता 17 सप्टेंबरपूर्वी प्रत्येक बसची चाचणी पूर्ण करून ठेवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

तसेच आगामी काळात दाखल होणाऱ्या 27 नवीन पीएम ई-बसेससाठी उपलब्ध चार्जर सुसंगत (कम्पॅटिबल) आहेत का, चार्जिंगची क्षमता व इलेक्ट्रिकल यंत्रणा योग्य आहे का, याची आगाऊ तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

चालकांची पात्रता व वैद्यकीय तपासणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश...

बस चालकांची नियुक्ती करताना त्यांच्या बॅच/बिल्ला, वैध ड्रायव्हिंग परवाना, किमान तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव तसेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट यांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पात्र व सक्षम चालकांचीच नियुक्ती होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

बससेवेतील सुरक्षाविषयक कोणतीही त्रुटी दुर्लक्षित न करता प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यां

ना दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow