औट्रम घाटाचे काम तातडीने पूर्ण करा, चितेगाव-बिडकीन-ढोरकीन बायपासला मंजुरी द्या - खासदार संदीपान भुमरे
औट्रम घाटाचे काम तातडीने पूर्ण करा; चित्तेगाव-बिडकीन-ढोरकीन बायपासला मंजुरी द्या - खासदार संदिपान भूमरे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी घेतली भेट; सोलापूर-धुळे महामार्गावरील निकृष्ट कामाबाबतही कारवाईची मागणी...
नवी दिल्ली, दि.11(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते व वाहतूक समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत चर्चा करून नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
कन्नड तालुक्यातील औट्रम घाटाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. अनेक वर्षांपासून या घाट परिसरातील वाहतुकीची समस्या कायम असून, या मार्गावरील काम पूर्ण झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून, परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे भुमरे यांनी निदर्शनास आणून दिले.
चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीनसाठी बायपासची मागणी...
यासोबतच छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावरील चित्तेगाव, बिडकीन आणि ढोरकीन गावांसाठी स्वतंत्र बायपास रस्त्यांना मंजुरी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणीही खासदार भुमरे यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर-पैठण हा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावर विविध औद्योगिक क्षेत्रे असून, दररोज हजारो कामगार, कर्मचारी, व्यावसायिक तसेच मालवाहतूक करणारी वाहने या मार्गावरून ये-जा करतात. त्याचबरोबर श्री क्षेत्र पैठण हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक या मार्गाने प्रवास करतात.
चित्तेगाव, बिडकीन आणि ढोरकीन या प्रमुख गावांमधून महामार्गावरील वाहतूक जात असल्याने स्थानिक वाहतूक, पादचाऱ्यांची वर्दळ, बाजारपेठेतील व्यावसायिक व्यवहार आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पैठणकडे जाणारे भाविक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढत असल्याचे भुमरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक वाहतूक आणि भविष्यातील वाढता विकास लक्षात घेता या गावांना बायपास देणे अत्यावश्यक आहे, असे सांगत खासदार भुमरे यांनी बायपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. बायपासमुळे अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक गावाबाहेरून वळविता येईल. त्यामुळे गावातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल, रस्ते सुरक्षा सुधारेल आणि औद्योगिक क्षेत्रासह श्री क्षेत्र पैठणला येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होईल.
करोडी-तेलवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत कारवाईची मागणी...
दरम्यान, सोलापूर-धुळे महामार्गावरील करोडी ते तेलवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा मुद्दाही खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच त्याची गुणवत्ता खराब झाल्याने संबंधित कामाची चौकशी करून दोषी संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भुमरे यांनी केली.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, तसेच भविष्यात अशा प्रकारची निकृष्ट कामे होऊ नयेत यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
What's Your Reaction?