दोन्ही पाय लोकल ट्रेनच्या दुर्घटनेत गमावले तरी इच्छाशक्तीने बनवले एमडी डॉक्टर, डॉ. रोशन जहाँची कहाणी
 
                                दोन्ही पाय गमावले तरी एमडी डॉक्टर बनण्यासाठी सरकारला बदलावा लागला कायदा....
एका मुस्लिम मुलीने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन पाय गमावले तरी इच्छाशक्तीने बनवले एमडी डॉक्टर...मुलीच्या हीमतीला दाद द्यावी लागेल, आमखास मैदानावर आयोजित एज्युकेशन एक्सपोत आपबिती सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावले...
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) वडील भाजीपाला व्यवसाय करायचे. घरची परिस्थिती हलाखीची, दोन वेळचे जेवण मिळणे कठीण, घरात तीन बहिणी, एक भाऊ, आई वडील, झोपडपट्टीत वास्तव्य, शाळा दहा ते पंधरा किलो मिटर असल्याने लोकल ट्रेनमध्ये प्रवास करुन शिक्षण घेत. स्वप्न होते डॉक्टर बनण्याचे पण ते नियतीला मंजूर नव्हते. सन 2008 मध्ये दहावीची परीक्षा देऊन घराकडे प्रवास करताना वाटले आपला स्टेशन आला. चालत्या ट्रेनमध्ये डोकावले असता डॉ.रोशन जहाँ शेख रेल्वेच्या पटरीवर पडून या दुर्घटनेत दोन्ही पाय गमावले. दुर्दैवाने हि घटना घडली कसेतरी तेथील रेल्वे विभागाचे रुग्णालयात दाखल केले पालकांना संपर्क केला. त्यावेळी असे वाटले जीवनाची डोर कापली गेली. वेदना अशा होत्या मृत्यू आले तर बरे. रुग्णालयातील डॉक्टर संपावर तरी कशितरी मलमपट्टी केली. खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची ऐपत नाही तरीही अल्लाहच्या कृपेने ऑपरेशन झाले. तीन महिने बेडवर पडून गेले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुन्हा व्हीलचेअर वर प्रवास सुरू झाला. त्यापासून ट्रेनच्या आवाजाशी घृणा निर्माण झाली. अकरावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य मिळवले त्याकाळी मेडीकल सिईटीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. एमबीबीएस करण्याची इच्छा होती. अपंगत्व 96 टक्के असल्याने मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवणे तारेवरची कसरत होती. एवढ्या अपंगत्वावर प्रवेश मिळवण्यासाठी नियमात बसत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. मनात वाटले आपण हि केस हरणार तरीही हिंमत सोडली नाही. तारीख पे तारीख सुरू होती. वकीलांनी युक्तिवाद केला तरी न्यायमूर्ती मानायला तयार नाही. एक वेळ अशी आली की स्वतः हिंमत करून घरुन लोकल रेल्वेस्टेशन व्हीलचेअरवर गाठले. लोकल ट्रेनमध्ये पुन्हा प्रवास सुरू करत न्यायालयात पोहोचले. न्यायमूर्तींना माझ्या वकीलाने सांगितले बघा हि मुलगी एकटी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करुन आली आहे तीच्या हिमतीला दाद द्यायला हवी. ती एमबीबीएस शिक्षण स्वतः पूर्ण करु शकते तिला एडमिशन मिळावे यासाठी न्यायालयाने निर्णय द्यावा अशी विनंती केली. मेडीकल कॉलेज मॅनेजमेंटने या मुलीला एमबीबीएस साठी एडमिशन द्यावे असा महत्त्वपूर्ण निकाल दिला व केएमई मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. सर्व कुटुंब आनंदात मावेनासे झाले. खडतर परिश्रमाने एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. कृत्रिम पाय बसवून तीस तीस तास रुग्णसेवा करत शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुढील शिक्षण एमडी पदवी करावी अशी इच्छा झाली. त्यावेळी प्रवेशासाठी तांत्रिक कारणामुळे प्रवेश मिळणार नाही कारण अपंगत्व आणखी आड आले. लोकसभेचे त्यावेळचे खासदार किरीट सोमय्या यांना कळाले की एमबीबीएस मुलगी आहे ती 96 टक्के अपंगत्व असल्याने कायद्याची अडचणी असल्याने एमडीसाठी प्रवेश मिळू शकत नाही. वेळ कमी असल्यामुळे न्यायालयात सुध्दा दाद मागता येणार नाही प्रवेशासाठी वेळ फक्त दोन दिवसाचे होते. खासदार किरीट सोमय्या यांनी अर्ज घेऊन दिल्ली गाठली. त्यावेळी डॉ.हर्षवर्धन केंद्रीय आरोग्यमंत्री होते. त्यांच्या टेबलावर हि फाईल गेली. त्यांनी विचार केला व तात्काळ थेट मला फोन केला व केईएम मेडीकल कॉलेजला तुमचा एमडीसाठी प्रवेश मिळणार म्हटले व एका दिवसात कायदा बदलला. इच्छाशक्ती व अल्लाहच्या कृपेने एमडी शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीवर मात करून व आत्मविश्वास असल्याने एकामागून एक संकटाला सामोरे जात अपंगत्वावर सुध्दा मात करत सर्व मार्ग सुकर होत गेले. आजच्या पिढीला सुध्दा मार्गदर्शन करताना विद्यार्थी व पालकांना त्यांनी सांगितले परिस्थितीवर मात करून गोल सेट करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी पैशाची नाही तर परिश्रम, आत्मविश्वास व चिकाटीची गरज आहे. खचून जाऊ नका...गोल सेट करा. तुम्ही यशस्वी होणार...आपल्या आयकाॅन चे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे चालत जा रस्ता आपल्याला मिळेल. देशाचे भविष्य घडवण्यासाठी आपले भवितव्य उज्ज्वल करा, वेळ सोशल मीडियावर वाया घालवू नका. विद्यार्थी जीवनात जे वय शिक्षणाचे त्याच वेळेचे भान ठेवून यश संपादन करावे असे मार्गदर्शन ऐतिहासिक आमखास मैदानावर आयोजित एज्युकेशन एक्सपोत डॉ.रोशन जहाँ शेख यांनी आपबिती सांगितली त्यावेळी विद्यार्थी पालकांचे डोळे पाणावले.
व्यासपीठावर प्राचार्य सायरा, मोटीव्हेशनल स्पिकर मुबश्शिरा फिरदौस, अम्मारा सिद्दीकी उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ.गजाला अबिद यांनी केले. टाळ्यांच्या कडकडाटात डॉ.रौशन जहांचे यावेळी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमानंतर सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            