औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशिरा रात्री येणार, मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

 0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशिरा रात्री येणार, मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्था सज्ज ठेवा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...

मतमोजणीसाठी एक हजार अधिकारी कर्मचारी, दोन ऑबसर्वर, 70 पोलिस अधिकारी, 500 पोलिस कर्मचारी, राज्य व केंद्रीय सुरक्षा बलाचा कडक सुरक्षा बंदोबस्त, शहरातही पोलिस बंदोबस्त असणार आहे....मतमोजणी केंद्रात मोबाईल आणता येणार नाही, सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल, रात्री आठ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे....

औरंगाबाद ,दि.27(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने एमआयटी महाविद्यालयात स्थापित केलेल्या मतमोजणी केंद्रात मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुरक्षा निकषांचे पालन करीत सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी अधिकची सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर राखावयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयत घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके ,पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर ,पोलीस निरीक्षक गिरी यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

 प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसाच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थांबाबत सुचना सांगण्यात आल्या. मत मोजणी केंद्रामध्ये कोणालाही मोबाईल फोन नेण्यास प्रतिबंध आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींचा ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्र परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ, राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा व्यवस्था तैनात आहेत. उमेदवाराचे एजंट आणि माध्यम प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर आणि मीडिया सेंटरची उभारणी मतमोजणी केंद्राच्या आवारात बाहेरील बाजूस करण्यात आलेली असून मतमोजणी प्रक्रियेची माहिती मीडिया सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यांच्या वाहतुक मार्गांमध्ये यथोचित बदल करुन रहदारीत किमान बदल करण्याचे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या सोबतच मतमोजणी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबविण्यात याव्या,असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow