गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा, पात्र लाभार्थ्यांचे मागवले अर्ज

 0
गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा, पात्र लाभार्थ्यांचे मागवले अर्ज

गरजू महिलांना रोजगारासाठी ‘पिंक ई रिक्षा’; पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24 (औरंगाबाद):- राज्यातील महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देऊन त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देणे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी महिलांना पिंक अर्थात गुलाबी ई- रिक्षा देण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील पात्र गरजू महिलांनी अर्ज सादर करावे,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. 

यासंदर्भात गरजु महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई रिक्षा उपलब्ध करुन देण्याबाबत दि.8 जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. 

योजनेचे स्वरुप आणि लाभार्थ्यांची पात्रता पुढील प्रमाणे -

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुसरक्षण गृह बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता यांना प्राधान्य. तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय खोकडपुरा येथे अर्ज करणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून होईल.

अर्थसहाय्य व कर्ज परतफेडः ई-रिक्षा किमतीच्या 10 % पात्र लाभार्थी, राज्य शासन 20 % आणि बँक 70 % कर्ज उपलब्ध करुन देईल.कर्जाची परतफेड 5 वर्षे (60) महिने आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रेः लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र (18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला), रेशनकार्ड, रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र, योजनेच्या अटी व शर्ती चे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना (Driving Licence) व पीएसव्हीए बिल्ला (PSVA Badge) मिळणेकरीता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील.

गरजु महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्लॉट नं.9 श्री.जाधव यांची इमारत, खोकडपुरा येथे संपर्क साधावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow