जिल्हाधिका-यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

 0
जिल्हाधिका-यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

निर्भय-निष्पक्ष निवडणुकांसाठी कायदा सुव्यस्थेचे नियोजन...

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आज पार पडली. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी तसेच सुरक्षा व्यवस्थांशी निगडीत नोडल अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागात मतदानाला सुरुवात होण्याच्या ७२ तास आधी सुरक्षा व्यवस्थांच्या अनुषंगाने काय नियोजन करावे व खबरदारी घ्यावी याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. अखेरच्या ७२ तासांत पोलिसांनी पथसंचलन करुन नागरिकांमध्ये निर्भय निवडणुकांबाबत आत्मविश्वास निर्माण करावा. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये निवडणुक आचार संहिता भंगासंदर्भात येणाऱ्या तक्रारींची तात्काळ नोंद करण्यात यावी. प्रचारादरम्यान होणाऱ्या आचारसंहिता भंगाच्या घटनांवर तात्काळ कारवाई करणे. आंतरजिल्हा सिमांवर वाहनांची तपासणी, शहरात येणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करुन तपासणी पथकांनी तपासणीसाठी सज्जता ठेवावी. प्रामुख्याने मद्य, अंमलीपदार्थ, रोकड, शस्त्रे इ. च्या वाहतुकीबाबत तपासणी करावी.याशिवाय मंगल कार्यालये, सभागृहे, धर्मशाळा, गेस्ट हाऊसेस अशा ठिकाणांची तपासणी करावी. तेथे बाहेरुन लोक येऊन थांबले आहेत का, सुरु असलेल्या जेवणावळी याबाबत तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले. तसेच मतदानासाठी जाणारे कर्मचारी, मतदान यंत्राची वाहतुक, मतदानानंतर मतदान यंत्रे जमा करावयाचे स्ट्रॉंग रुम यांचा बंदोबस्त, प्रत्यक्ष मतदान केंद्रांवरील बंदोबस्त, मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरातील बंदोबस्त याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले.

 जिल्ह्यातील सुरक्षा पथकांनी निर्भय निष्पक्ष निवडणुकांसाठी सज्ज असल्याचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow